“सगळ्या बोडो मुलींसारखं, मी आईला विणताना पाहतच मोठी झाले,” सामा ब्रह्मा सांगतात. खुजराबगुडी नं. २ गावात घराच्या ओसरीत बांबूची पायपट्टी असलेल्या आपल्या मागापाशी त्या बसल्या होत्या. दक्षिण आसामच्या बोडोलँडमधल्या चिरांग जिल्ह्यातल्या अई नदीच्या किनारी हिरव्या कंच भातशेतांमध्ये हे गाव वसलं आहे.
इथून सगळ्यात जवळचं गाव, बोंगाईगाव, २० किमी अंतरावर आहे. काही ठिकाणी नदीचा वाळूभरला किनारा पार करत किंवा मोडकळीला आलेल्या एका बांबूच्या पुलावर जरा जपूनच पाऊल टाकत ८७ उंबरा असणाऱ्या त्यांच्या गावी पोचता येतं.
आसामच्या गावांमध्ये बोडो समुदायाच्या सगळ्या घरांमध्ये हातमाग असतोच. हा समुदाय (आसामीमध्ये बोरो) अनुसूचित जमातींमध्ये मोडतो. कापड कातता येणं हे बाईकडचं आणि भावी वधूकडचं अत्यंत मोलाचं कौशल्य मानलं जातं. मात्र सामासारख्या काही मोजक्या जणींनीच त्यांचं हे परंपरागत कौशल्य वापरून त्यातून काही कमाई केली आहे.
“मी पंधरा वर्षांची होण्याआधीपासूनच कापड विणतीये. साला माता कपडा [साधं कापड] विणण्यात मी तरबेज झाले,” ४२ वर्षीय सामा सांगतात. “माझा आत्मविश्वास वाढू लागला तसं मी गोमोसा [शालीसारखं वस्त्र] आणि पलंगपोस विणू लागले. पण मला सगळ्यात जास्त काय आवडायचं तर दोखोणा [साडीसारखं वस्त्र] तोही गुंतागुंतीची फुलांची नक्षी असलेला.”








