“ नाही धनी येथ कुणी नाही चाकर ... धरतीची आम्ही लेकरं , भाग्यवान . धरतीची आम्ही लेकरं .”
हे गाणं म्हणणारी मुलं आहेत एका खेडेगावातल्या शाळेतली. त्याचं गाणं आणि त्यांचं जगणं यातला विरोधाभास किती उघड आहे. शहरातल्या शाळांच्या मानाने गावातल्या शाळांना फारच तोकड्या सोयी-सुविधा, आर्थिक निधी आणि संधी दिल्या जातात. अगदीच अपुऱ्या पगारांवर नेमलेले हंगामी शिक्षक, जे शिक्षक म्हणून बिलकुल पात्र नाहीत – काही राज्यांनी तर शिक्षक पात्रता परीक्षाच रद्द केल्या आहेत जेणेकरून पूर्णपणे अपात्र लोकांना अत्यंत कमी पगारात राबवून घेता यावं. आणि काही शाळा तर अशा जिथे अनेक वर्षं कुणी शिक्षकच नाहीयेत.
तरीही तितक्याच जोशात आणि आत्मविश्वासाने पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नांदगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतली ही मुलं गातायत. या सगळ्या आदर्शांवर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विनंतीखातर बाल भारतीच्या चौथीच्या पुस्तकातली ही कविता त्यांनी आम्हाला गाऊन दाखवली.
ही कविता आहे लोकशाहीर द. ना. गवाणकर यांची. शाहीर अमर शेख आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासमवेत ते लाल बावटा कला पथकात होते. त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आणि नंतरच्या काळात इतर लेखकांच्या दृष्टीने हे तिघं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि जनसामान्यांमधला दुवा होते. (या चळवळीने मुंबई, विदर्भासह मराठी भाषिकांचं संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावं यासाठी लढा दिला).
१९४० मध्ये या तिघा शाहिरांची कवनं आणिं गाणी मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये आणि इतर कामगार वर्गात अतिशय लोकप्रिय होती.
आम्ही तिथनं निघालो तरी आमच्या कानात त्या गाण्याचे शब्द निनादतायतः “ स्थापू समानता , पोलादी ऐक्यता ... नाही धनी येथ कुणी नाही चाकर .”
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान
धरतीची आम्ही लेकरं..
शेतावरं जाऊया, सांगाती गाऊया
रानी वनी गाती जशी रानपाखरं
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान
धरतीची आम्ही लेकरं..
मेहनतं जिमनीवरी, केली वरीसभरी
आज आलं फळं त्याचं डुले शिवर
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान
धरतीची आम्ही लेकरं..
शाळु जुंधळा मोती, चमचम
चमकत्याती मोत्यांची सालभरी खाऊ भाकरं
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान
धरतीची आम्ही लेकरं..
स्थापू समानता पोलादी ऐक्यता
नाही धनी येथ कोणी नाही चाकर
धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान
धरतीची आम्ही लेकरं..
अनुवादः मेधा काळे