पायडिपाका गावातून बळजबरी बाहेर पडावं लागलेले उप्पल प्रवीण कुमार आजही त्यांना कबूल केलेल्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना सतत आपला पसारा उचलून इकडून तिकडे हलावं लागतंय – आधी शाळेत, मग भाड्याच्या घरात, तिथून आई-वडलांच्या घरी आणि नंतर तर चक्क तंबूत.
आम्ही पहिले दोन महिने – मे आणि जून – हुकुमपेटातल्या जिल्हा परिषद शाळेत काढले. मग शाळा सुरू झाली आणि आम्हाला वर्ग भरतात त्यामुळे शाळा खाली करावी लागली, ते सांगतात.
माला या दलित समुदायाच्या ३० कुटुंबांपैकी त्यांचं एक कुटुंब. या सगळ्यांनाच पायडिपाकापासून २० किलोमीटरवर असलेल्या गोपालपुरम मंडलमधल्या हुकुमपेटामध्ये घर देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. चोवीस कुटुंबांना घर मिळालंदेखील – लहान आणि निकृष्ट दर्जाचं – पण सहा कुटुंबं अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत. २०१६ च्या उन्हाळ्यामध्ये पोलावरम मंडलमधल्या पायडिपाकामधून ४२० कुटुंबांना गावातून हुसकून बाहेर काढण्यात आलं त्यातली ही ३० कुटुंबं.
ही घर न मिळालेली सहा कुटुंबं नव विवाहितांची आहेत जे त्यांच्या आईवडलांसबोत पायडिपाकामध्ये राहत होते. भू संपादन व पुनर्वसन कायदा, २०१३ नुसार प्रत्येक विवाहित सज्ञान व्यक्ती (अजूनही प्रकल्पग्रस्त गावात राहणारी) एक स्वतंत्र कुटुंब म्हणून गणली गेली पाहिजे आणि अशा कुटुंबाला पुनर्वसन योजनेअंतर्गत घर आणि एकरकमी मोबदला दिला गेला पाहिजे. प्रवीण, वय २३ आणि त्याची पत्नी अनिता, वय २२, दोघांना दोन मुलं आहेत, एक तीन वर्षांचा आणि धाकटा एक वर्षाचा.








