त्यांच्या हसण्यामुळे आमचं लक्ष वेधलं गेलं. काही मुली दोरीवर उड्या मारत होत्या, बरीच मुलं क्रिकेटमध्ये रमली होती, काही पळत होती तर काही नुसतीच कडेला त्यांच्या सवंगड्यांना मोठ्या मैदानावर खेळताना पाहत एकट्याने उभी होती.
पुणे जिल्ह्याच्या दौंडमध्ये पारीच्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठीचं आमचं ध्वनीमुद्रण, चित्रीकरण नुकतंच संपलं होतं, तितक्यात मलठणच्या येवले वस्तीवरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हसण्याने आमचं लक्षं वेधून घेतलं.
मैदानात क्रिकेटचा सामना रंगात आला होता, फलंदाजानं कॅमेरा वगैरे जामानिमा घेऊन त्याच्या दिशेने येणाऱ्या आमच्या ताफ्याकडे एकदा पाहिलं आणि परत आपलं लक्ष गोलंदाजाकडे वळवलं आणि जोरदार फटका मारला. फिल्डर्स चेंडूच्या मागे धावले.
काही मुली आमच्याभोवती गोळा झाल्या. त्यांना थोडी गळ घातल्यावर त्या गाणं म्हणायला तयार झाल्या. मात्र सुरुवातीला त्या थोड्या लाजत होत्या. एकमेकींकडे बघत त्यांनी गाणं नीट येतंय ना याची खातरजमा केली. पारी टिमच्या जितेंद्र मैड यांनी मुलांना एका गोलात उभं केलं आणि त्यांना गाणं आणि नाच असणारा एक खेळ शिकवायला सुरुवात केली. सगळे त्याच्या मागोमाग एकेक ओळ म्हणू लागले आणि त्यांनी केलेली क्रिया करू लागले.





