विकाश यादव आणि लक्ष्मण सिंग कमला मार्केटमध्ये येईतोवर दुपार होऊन गेलीये. बैलगाडीतून आलेत ते. जवळपास रोजच ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या या गर्दीच्या मालधक्क्यावर ते बैलगगाडीतून माल वाहून आणत असतात. शक्यतो हा माल सब्झी मंडी रेल्वे स्टेशनवळच्या उत्तर-मध्य दिल्लीच्या प्रताप नगरहून आणला जातो.
सहा किलोमीटर दूर असणाऱ्या या दोन्ही बाजारांमध्ये मालवाहतूकदार मालगाड्या आणि ट्रकमधून आणलेला माल जवळच्या अंतरावर नेण्यासाठी भाड्याने बैलगाड्या घेतात. यात लुधियानाहून येणारे सायकलींचे सुटे भाग, आग्र्याचे जोडे, पंजाब आणि मध्य प्रदेशातला गहू आणि दक्षिण भारतातून येणारे गाड्यांचे सुटे भाग असा विविध प्रकारचा माल असतो.
बैलगाडी चालकांच्या कामात माल भरणं आण उतरवणं दोन्ही समाविष्ट असतं. “एका खेपेसाठी टेम्पो १००० रुपये घेतो. बैलगाडी स्वस्त पडते, नाही तर आम्हाला कोण विचारतंय? आम्ही रोज दोन खेपा करतो आणि दिवसाला ८००-९०० रुपये कमवतो,” २३ वर्षांचा विकाश सांगतो.
मालवाहतूकदार आपापल्या गोडाउनमधून जवळच्या दुकानांमध्ये माल पोचवण्यासाठी देखील बैलगाड्यांचा वापर करतात. आणि बरेचसे दुकानदार बैलगाडीतून त्यांचा माल शहराच्या इतर भागात पोचवतात.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी विशिष्ट वेळात आणि विशिष्ट भागातच बैलगाड्यांना परवानगी दिली असली तरी २७ वर्षीय लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, फारसे काही कडक नियम नाहीत. “आम्हाला काही परमिट लागत नाही किंवा चलन फाडावं लागत नाही. त्यामुळे आम्ही बैलगाड्या वापरतोय.”
कमला मार्केटपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या गर्दीने गजबजलेल्या मोतिया खान भागात विकाश आणि लक्ष्मण (शीर्षक छायाचित्रातील) यांच्या मालकीचे तसंच इतरांचेही बैल अरुंद गल्ल्यांमध्ये उभे आहेत. मध्य दिल्लीच्या पहाड़ गंज भागात अनेक बैलगाडी मालक राहतात. चालू नसलेल्या गाड्या रस्त्याच्या कडेने उभ्या केलेल्या दिसतात – त्यांचे चालक गप्पा टप्पा करत आपापल्या गुरांना खायला घालताना दिसतात.
त्यांच्यातलेच एक आहेत भोलू सिंग, ज्यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच मोतिया कान भागात बैलांचा कासरा हातात घेतला. “मी शाळा पाहिलीच नाहीये. स्वतः एकट्याने गाडी चालवण्याआधी मी माझ्या वडलांसोबत त्यांच्या गाडीवर जायचो. एक दिवस त्यांनी मला सदर बाझारला काही माल पोचवून यायला सांगितलं, आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली ती आजही सुरूच आहे,” ते सांगतात. आता त्यांच्याकडे तीन गाड्या आहेत, तीन बैल आणि एक वासरू आहे.
६४ वर्षांचे भोलू मोतिया खानमध्येच जन्मले. त्यांचे वडील १२ वर्षांचे असताना त्यांचे आजी-आजोबा राजस्थानच्या चित्तौडगढच्या एका गावातून दिल्लीला आल्याचं ते सांगतात. भोलूच्या आजोबांनी काही संपत्ती विकली आणि एक बैलगाडी घेतली. त्याच गाडीतून ते पोटापाण्याच्या शोधात दिल्लीला आले.
विकाश आणि लक्ष्मणप्रमाणे बोलू देखील त्यांच्या गाडीवर दिल्लीच्या मध्यभागात १५-२० किलोमीटरच्या दिवसातून दोन खेपा करतात. वाहतूक किती आहे त्यावर किती वेळ लागेल ते अवलंबून असतं तरी शक्यतो त्यांना एका बाजूच्या प्रवासाला ४५-६० मिनिटं लागतात. त्यांनाही दिवसाला ८००-९०० रुपयांची कमाई होते. हिवाळ्यात ते एखादी जादाची खेप करण्याचा प्रयत्न करतात ज्यातून अधिकचे ३००-६०० रुपये हाती पडतात. “पण माझी एका पैशाची बचत होत नाही,” ते सांगतात. “निम्मा पैसा बैलांची काळजी घेण्यात जातो आणि बाकी रोज लागणाऱ्या गोष्टींवर.”
भोलूंचं मोतिया कान भागात स्वतःच्या मालकीचं घर आहे. ३० वर्षांपूर्वीच स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी हे घर बांधलंय पण ते स्वतः मात्र आपल्या बैलांजवळ फूटपाथवर पत्रा आणि ताडपत्रीच्या एका छोट्याशा खोलीत मुक्काम करतात. त्यांच्या पत्नी ६० वर्षीय कमलाबाई देखील त्यांच्या बैलांची काळजी घेण्यासाठी तिथेच राहतात. तिशीत असलेल्या त्यांच्या तिन्ही मुलांनी लग्न झाल्यावर बऱ्या कमाईच्या आशेत बैलगाडी चालवणं सोडून दिलं. ते बांधकामावर, पहाड़ गंज किंवा शहादऱ्यातल्या कारखान्यांमध्ये हमाल म्हणून कामं करतात. भोलूंनी बांधलेल्या घरात ते आपापल्या कुटुंबासोबत वास्तव्य करतात.
मोतिया खानमधली इतर तरुण मंडळी मात्र आपल्या वडलांच्या पावलावर पाऊल टाकून गाडी चालवतायत. १८ वर्षांच्या कल्लू कुमारने शाळा सोडली आणि बैलगाडी चालवायला सुरुवात केली. “मी शिकत होतो तेव्हाच मी शाळा सुटली की माझ्या वडलांसोबत माल पोचवायला जायचो आणि बैलांचं सगळं पहायचो,” तो सांगतो. दहावी पास होईना तेव्हा कल्लूने शाळा सोडली. “मी माझ्या वडलांची बैलगाडी चालवायला लागलो कारण घरच्यांकडे मला शाळेत पाठवण्याइतके पैसे नव्हते. आता मला दिवसाला सरासरी ५००-६०० रुपये मिळतायत,” तो सांगतो.
शाळा सोडल्याचा कल्लूला कसलाही पश्चात्ताप नाही. “मी कमावतोय आणि माझ्या घरचे खूश आहेत. मी माझ्या वडलांच्या पावलावर पाऊल टाकून गाडी चालवायला लागलोय,” तो सांगतो. कल्लूचा २२ वर्षांचा थोरला भाऊ सुरेश देखील गाडी चालवतो आणि धाकटा, ८ वीत शिकणारा १४ वर्षांचा चंदन कधी कधी त्याच्यासोबत जातो.
कल्लूच्या घरापासून जवळच विनय कुमार सिंग राहतो. त्याच्या दोन बैलगाड्या आणि दोन बैल आहेत. आपल्या मुलांनी इतर पर्यार शोधावेत अशी त्याची इच्छा आहे. ११ वर्षांच्या राजेशकडे पाहत तो म्हणतो, “मी त्याला शाळेत घातलंय आणि त्याच्या शिक्षणासाठी मला शक्य आहे ते सगळं मी करेन. माझ्या वडलांकडे फार काही साधनं नव्हती, पण मी मात्र गाडी चालवून त्याच्यासाठी सगळं करणार आहे.” राजेश आणि त्याचा ८ वर्षांचा धाकटा भाऊ सुरेश पहाड़ गंजच्या सरकारी शाळेत शिकतात.
३२ वर्षांच्या विजयने गाडी चालवायला घेतली तेव्हा त्याचं वय १२ पण नसेल. “आम्ही शहरात राहत असलो तरी आमचं काम मात्र परंपरागत आहे. चित्तौडगढ़मध्ये माझा मामा राहतो, त्याच्याकडे शेतीसाठी एक बैल होता. पण तोही आता ट्रॅक्टर वापरायला लागलाय,” तो सांगतो. बेगुन तहसिलातल्या दौलतपुरा गावातल्या आपल्या मामाच्या शेतीविषयी तो सांगतो. त्याच्याकडे जास्त कुशल व्यवसाय असता तर त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं असतं असं तो म्हणतोः “परंपरा टिकवून ठेवल्याची किंमत काय चुकवावी लागते ते आम्हाला माहित आहे. पण आमच्या बैलांवर आमची माया आहे. आमच्या कुटुंबातलेच सदस्य आहेत ते.”
विजय आणि त्यांची बायको सुमन, वय ३० दोघंही त्यांच्या जनावरांची काळजी घेतात. बैलांना भाताचा आणि गव्हाचा कोंडा तसंच सकाळ, दुपार आणि संध्याकाळी हरभरा खायला घालतात. उन्हाळ्यात उन्हाच्या तलखीचा त्रास होऊ नये आणि अंगात शक्ती रहावी यासाठी त्यांच्या आहारात गूळ, दूध, लोणी आणि मोरावळा देखील घातला जातो.
बैलगाडी मालक सांगतात की कधी कधी देवस्थान आणि धार्मिक संस्थांद्वारे चालवण्यात येत असलेल्या गोशाळांकडून त्यांना बैलांसाठी खाणं आणि औषधं मिळतात. पण गोशाळेत केवळ गायीच सांभाळल्या जात असल्याने एखादा बैल १७-१८ वर्षांचा झाला की बैलगाडीवाले त्याला हरयाणा आणि उत्तर प्रदेशाच्या ओसाड भागांमध्ये सोडून देतात. अशी जनावरं सापडल्यास तिथले खाटिक घेऊन जातात.
बैलगाडी मालक याच राज्यांमधून, आणि राजस्थानातून गोऱ्हे विकत घेतात, विकास सांगतो. जनावराच्या वयावर त्याची किंमत अवलंबून असते. वर्षाच्या वासराला रु. १५,००० पासून सुरू होऊन सात वर्षांच्या बैलाला ४०,००० ते ५०,००० रुपये मोजावे लागतात. या वयात बैल सगळ्यात जास्त उत्पादक असतो. बचतीतून किंवा माल वाहतूकदारांकडून १.५ ते २ टक्के महिना व्याजाने कर्ज काढून ही खरेदी केली जाते.
नवीन बैलगाडी घ्यायची असेल तर तिलाही ५०,००० ते ६०,००० रुपये इतका खर्च येऊ शकतो. पहाड़ गंज किंवा शहादऱ्यातल्या लोहारांना गाडी जुंपायचं काम दिलं जातं. ते स्थानिक सुतारांकडून गाडी बनवून घेतात. त्यासाठी आंबा, कडुनिंब किंवा बाभळीचं लाकूड वापरलं जातं. शिसवी लाकडाची गाडी जास्त महागात जाते. गाडीची धाव, इत्यादी लोखंडाची बनवून घेतात. ते स्वस्त पडतं. नाही तर मग स्टील किंवा अल्युमिनियमची. हरयाणा किंवा राजस्थानातूनही गाड्या विकत घेतल्या जातात. त्या जरा स्वस्त पडतात.
भोलू आणि विकाश यांच्या अंदाजानुसार राजधानीत ४५०-५०० बैलगाड्या आहेत. पण दिल्ली वाहतूक पोलिसांकडे यांची कसलीही माहिती नाही कारण बैलगाड्यांना कुठेही नोंदणी करावी लागत नाही.
आता मालवाहतुकीसाठी स्वयंचलित गाड्यांची संख्या वाढल्यामुळे बैलगाडी मालकांचं उत्पन्न मात्र घटत चाललं आहे. “पूर्वी मी अगदी फतेहपूरपर्यंत [उत्तर प्रदेशात, इथून ५५० किलोमीटरवर] माल घेऊन जायचो. पण आता अशी सगळी कामं वाहतूकदार छोट्या ट्रकवाल्यांना देतात. अगदी ४-५ किलोमीटरवर माल सोडायचा असेल तरी ते चॅम्पियनवर माल लादतात,” भोलू सांगतात.
ते सांगतात की पूर्वी १९९० च्या दशकात त्यांची दिवसाची कमाई दिवसाला केवळ ७० रुपये इतकी होती. पण त्यांना कामं शोधावं लागत नसे. त्यांना शहरातल्या रस्त्यांवर जायला कोणती बंधनं नव्हती. “तेव्हा मी खूश असायचो. रोज काम मिळायचं. पण आता मात्र एखादा दिवस मला रिकामं घरी बसावं लागतं,” ते सांगतात.
दिवस ढळत चाललाय, विजय आणि कल्लूने त्यांची बैलं बांधली आहेत. ते रिकाम्या गाडीत बसलेत सोबत भोलू आणि इतर काही जण आहेत. भोलू बिडी पेटवतात आणि जुन्या दिवसांच्या आठवणींचा झुरका घेत म्हणतात, “आजूबाजूला बैलगाड्या पाहत मी लहानाचा मोठा झालो. माझ्या नातवंडांना किमान या रिकाम्या गाड्या तरी पहायला मिळाव्यात.” बाकी सगळे निमूट माना डोलावतात.
अनुवादः मेधा काळे