जर त्याच्या पत्नीला, आरयीला घरी यायला पाच मिनिटंही उशीर झाला असता तर सेत्तने या जगात राहिला नसता. तिने दारात पाऊल टाकलं तेव्हा त्याने गळ्याभोवती फास आवळलाच होता.
“जवळजवळ सगळं संपलंच होतं,” असं म्हणणाऱ्या के. लेकन – टोपणनाव सेत्तू – या साध्या शेतकऱ्याला आपलं हे धाडस वाया गेल्याचं आता समाधान वाटत होतं. आरयीने आरडाओरड करून शेजारच्यांना बोलावलं आणि त्यांनी सेत्तूला खाली उतरवलं. आलेलं संकट टळलं होतं.
६ नोव्हेंबर, २०१६ चा तो दिवस. पन्नाशीत असलेला सेत्तू आपल्या दीड एकर रानात धानाचं पीक कसं घ्यावं या विचाराने त्रस्त होता. तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील तयनुर गावातील त्याचं पडक शेत पाहून तो उद्ध्वस्त झाला होता. त्याने दुबार पेरणी करूनसुद्धा धानाचं पीक आलंच नाही.
“बायका-मुलं इतर शेतात कामाला गेले असताना मी घरी परतलो. घेतलेलं कर्ज कसं फेडणार, घरदार कसं चालवणार याचा विचार करत होतो.” जिल्हा सहकारी बँक आणि सावकाराचं असं मिळून एकूण १,५०,००० देणं आहे, असं सेत्तू सांगत होता. “या चिंतेनेच मी आत्महत्या करण्याचं ठरवलं.”
त्यानंतर काही महिन्यांतच २०१७ च्या एप्रिल-मे दरम्यान कावेरी खोऱ्यातल्या – एकेकाळी सुपीक असलेल्या – प्रदेशातील शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत कर्जमाफीकरिता तोंडात उंदीर धरून, मानवी कवट्या मांडून, जमिनीवर लोळण घेत जोरदार आंदोलन केलं. त्यांच्या प्रदेशातील कित्येक शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोजाने कंटाळून जीव दिलाय तर अनेकांना हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले आहेत.
जानेवारी २०१७ मध्ये ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’च्या वतीने अनेक शेतकरी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, डॉक्टर आणि इतर सदस्यांनी या प्रदेशातील ५० अकस्मात मृत्यूंचा अभ्यास करायचं ठरवलं. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते अशा मृत्यूंची संख्या २०० च्या वर गेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ५ जानेवारी, २०१७ रोजी राज्य सरकारला दिलेल्या माहितीनुसार कमीतकमी १०६ शेतकऱ्यांनी २०१६ च्या डिसेंबर महिन्यातच आत्महत्या केली आहे.
ही तमिळनाडूवर घोंघावणाऱ्या गंभीर संकटाची नांदी आहे. समृद्ध अशा कावेरी खोऱ्यातील गावोगावीचे शेतकरी मात्र हे मानवनिर्मित संकट असल्याचं सांगतात. त्यांच्या मते कुठल्याही दुष्काळापेक्षा ही परिस्थिती वेगळी आहे.





