अंबादास काकडे यांनी समजून सवरून यंदा खरिपात दुसरं पीक घ्यायचं ठरवलं. शेतीच्या खर्चातील काही अंशी रक्कम परत मिळविण्याची ही त्यांची शेवटची आशा आहे.
जूनच्या मध्यात पडलेल्या समाधानकारक पावसानंतर परभणी जिल्ह्यातील सैलू तालुक्यातील मोरेगावचे रहिवाशी असलेल्या ८३ वर्षीय अंबादास काकडे यांनी कापूस, सोयाबीन, तूर आणि मुगाचं पीक घेतलं होतं. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यापर्यंत सबंध मराठवाड्यात काहीच पाऊस झाला नाही. परभणी समवेत या भागातील जमिनीच्या लांबच लांब पट्ट्यांवर पेरलेली पिके वाळून गेली किंवा खुरटली. काकडेंनी लागवड केलेलं सोयाबीन, तूर आणि मूगसुद्धा सुकून गेलं.
“माझ्याकडे एकूण १० एकर जमीन आहे,” ते म्हणाले. “पैकी [जुलै महिन्या अखेर] एक एकर जमिनीतला कापूस उपटून मी कोबीची लागवड केली. कारण, कोबी तीन महिन्यातच उगवते आणि तिच्या पिकाला पाणीसुद्धा कमी लागतं. जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर मी आणखी एका एकरात टमाट्याचं [कमीच पाणी लागणाऱ्या] उत्पादन घेईन.”
आपल्या शेतात एक एकर जमिनीवर अगोदरच लागवड केलेला कापूस उपटून त्याऐवजी कोबीचं पीक घेतल्याने काकडेंना १५,००० रुपयांचा तोटा झाला आहे. जर अवर्षणाचं चक्र असंच सुरू राहिलं तर कोबीच्या लागवडीत खर्च केलेले १५,००० रुपये सुद्धा वाया जातील. “मला कळतंय हो, यंदाच्या खेपेला मला नफा मिळणार नाही,” ते म्हणाले.






