हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.
रान, पण स्वतःचं नसणारं
शेतमालक अभिमानाने फोटो काढून घेत होता. त्याच्या रानात नऊ बाया कमरेत वाकून लावणीचं काम करत होत्या आणि हा पठ्ठ्या त्यांच्यावर नजर ठेवत ताठ उभाच्या उभा. त्यानं सांगितलं की तो त्यांना दिवसाचे ४० रुपये देतो. नंतर त्या बायांनी आम्हाला माहिती दिली की तो त्यांना दिवसाला २५ रुपयेच देत होता. त्या सगळ्या ओरिसातल्या रायगडाच्या भूमीहीन शेतमजूर.
भारतामध्ये अगदी जमीनदार घरातल्या बाईलाही जमिनीवर कोणताच हक्क नाही. त्यांच्या माहेरच्या घरातही. आणि त्यांच्या नवऱ्याच्या, सासरच्या घरीही. परित्यक्ता, विधवा किंवा घटस्फोट झालेल्या बाया नातेवाइकांच्याच रानात अखेर शेतमजूर म्हणून काम करू लागतात.








