मोहम्मद शमीम बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील खारज (दिनमानपूर) या त्यांच्या गावी आपल्या घरच्यांसाठी अफ़लातून मिठाई घेऊन जाणार आहेत. "३६ तासांच्या प्रवासात ही खराब होत नाही, आणि ही मुंबईतील सर्वांत बढिया मिठाई आहे," ते तूप आणि मावा घालून तयार केलेल्या मिठाईचे गोडवे गातात. शमीम घरी जाऊन आले त्याला ६ महिने होत आलेत आणि यंदाच्या भेटीसाठी ते बरेच आठवडे अगोदरपासून तयारी करत आहेत. त्यांच्या पत्नी सीमा खातून यांना त्यांच्याकडून "एक बम्बई स्टाईल सूट [सलवार कमीज]", एक केश तेल, एक शॅम्पू, एक फेस क्रीम अन् आणखी अशी भेट हवी आहे ज्याबद्दल बोलताना ते लाजतात.
जमिनीवर बसून शमीम चारही बाजूंनी लाकडी फळ्यांवर ताणलेल्या कापडावर भराभर प्लास्टिकची पानं आणि फुलं भरत आहेत. जरीकाम करण्यासाठी ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हापासून, गेली साधारण दहा वर्षं, ते मध्य मुंबईच्या माहीम येथील या कारखान्यात - "ज्याला प्रत्येकजण अस्लमभाई का कारखाना म्हणून ओळखतात" - काम करत आहेत.
कारखान्यात एका बाजूच्या छोट्या खोलीत कप्प्यांमध्ये कपडे, पिशव्या आणि चटया ठेवल्या आहेत. जवळपास ३५ कामगार - बहुतांशी स्थलांतरित - या ४०० स्क्वेअर फूट मुख्य खोलीत एकाच वेळी जरीकाम करायला बसतात. त्यांतले बरेच याच खोलीत रात्री झोपतात. उन्हाळ्यात फक्त सीलिंगच्या पंख्याने भागत नाही, म्हणून, शमीम हसून म्हणतात, "प्रत्येकाला खोलीतल्या एकुलत्या स्टँडवरच्या पंख्याजवळ झोपावंसं वाटतं."
खरं तर सोनं किंवा चांदीच्या मिश्रधातूच्या तारा लोकरीत विणून जरीकाम करण्याची परंपरा आहे मात्र आजकाल तांबं किंवा आणखी हलक्या प्रतीच्या मिश्रधातूंनी नाहीतर तकतकीत प्लास्टिक सारख्या वस्तूंनी सजवून पण जरी करता येते. माहीम येथील कारखान्यात कारागीर धातूची जरही भरतात, ग्राहकांनी - सामान्यतः दुकानदार आणि फॅशन डिझायनर - केलेल्या मागणीवर हे अवलंबून असतं.
आता चाळिशीत असलेल्या शमीम यांनी या छोट्या खोलीपर्यंतचा प्रवास १५ वर्षं वयापासून सुरु केला. ते एका उर्दू-माध्यमाच्या शाळेत इयत्ता ५ वी पर्यंतच शिकले होते. त्यांचे वडील मोहम्मद शफिक यांना काला आजार (वाळू माशी चावल्याने होणारा आजार) झाल्यानंतर ते जवळपास दहा वर्षं आजारी होते. तेव्हा त्यांचे आजोबा आणि एक काका त्यांचं घरदार सांभाळत होते. शमीम म्हणतात की, त्यांनी जर का जरीकामाचं काम हाती घेतलं नसतं तर तेदेखील आपल्या वडलांसारखे खाटीक झाले असते.








