महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातले २३ आदिवासी शेतकरी २७ नोव्हेंबरच्या सकाळी दक्षिण दिल्लीतल्या निझामुद्दिन रेल्वे स्थानकात उतरले. सुमारे ३० मिनिटं पायी चालत ते सराई काले खान परिसरातल्या श्री गुरुद्वारा बाला साहिबजी इथे पोचले. २९-३० नोव्हेंबर रोजी देशाच्या राजधानीत होणाऱ्या किसाम मुक्ती मोर्चात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुरुद्वारेच्या आवारातल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत राहण्याची साधी सोय करण्यात आली होती.
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास या इमारतीत पोचलेले हे यवतमाळचे शेतकरी इथे येणारे पहिलेच. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे सदस्य आणि नेशन फॉर फार्मर्सचे सेवाभावी कार्यकर्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा रात्रीचा मुक्काम, जेवण इत्यादी पाहण्यासाठी सज्ज होते.
इथे पोचण्यासाठी हे कोलाम आदिवासी शेतकरी आधी महाराष्ट्र – आंध्र प्रदेश महामार्गावरच्या पिंपळकुटी गावाहून सात तास प्रवास करून २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी नंदीग्राम एक्सप्रेसने नागपूरला पोचले. त्यानंतर त्यांनी केरळहून निझामुद्दिनला जाणारी दुसरी गाडी पकडली.








