सोमवारी सकाळचे ११:०० वाजले होते. मुनेश्वर मांझी, ४१, आपल्या पडक्या घराबाहेर एका चौकीवर पहुडले होते. घरासमोरच्या त्या मोकळ्या जागेत बांबूच्या काठ्यांनी बांधलेली निळी ताडपत्री त्यांचं उन्हापासून संरक्षण करते. पण इथल्या दमट वातावरणाचं काही होऊ शकत नाही. "गेले १५ दिवस काहीच काम मिळालं नाही," मुनेश्वर म्हणतात. ते पटना शहरापासून अंदाजे ५० किमी अंतरावर असलेल्या काको येथील मूसाहारी टोल्यावर राहतात.
मूसाहारी टोला अर्थात वस्तीत मूसाहार या दलित समाजाची एकूण ६० कुटुंबं राहतात. मुनेश्वर आणि त्यांच्या वस्तीतले बरेच जण आसपासच्या शेतांमध्ये काम करून मिळणाऱ्या रोजंदारीवर जगतात. पण मुनेश्वर म्हणतात की हे काम नियमित नसतं. ते वर्षाचे ३-४ महिनेच, खरीप आणि रब्बी पिकांची पेरणी आणि कापणी दरम्यान मिळतं.
त्यांना नुकतंच एका राजपूत जमीनदार 'बाबू साहेबा'च्या शेतावर काम मिळालं होतं. "आठ तास कामाचे आम्हाला १५० रुपये किंवा ५ किलो तांदूळ मिळतात. बस्स!" मुनेश्वर रोजंदारी करणाऱ्या शेतमजुरांची व्यथा सांगतात. नगदी रकमेऐवजी मिळणाऱ्या तांदळासोबत ४-५ पोळ्या, किंवा वरणभात आणि एक भाजी, असं जेवणही मिळतं.
त्यांच्या आजोबांना १९५५ मध्ये भूदान चळवळीदरम्यान तीन बिघा (जवळपास दोन एकर) जमीन मिळाली होती, पण ती काही कामाची नाही, ते म्हणतात. त्या काळात जमीनदारांनी आपल्या जमिनीचे काही पट्टे भूमिहीन लोकांना दान केले होते. "आम्ही राहतो तिथून ही जमीन तीन किलोमीटर लांब आहे. आम्ही पेरणी केली की जनावरं नासधूस करतात आणि आमचं नुकसान होतं," मुनेश्वर सांगतात.
बहुतेक दिवस मुनेश्वर आणि वस्तीतल्या इतर जणांच्या घरचे लोक मोहाच्या (मधुका लाँगीफोलिया - लॅटीफोलिया प्रजाती) फुलांची दारू गाळून विकतात आणि आपलं पोट भरतात.
मात्र या कामात जोखीम खूप मोठी आहे. बिहार (दारू) प्रतिबंध आणि जकात कायदा, २०१६ या कठोर कायद्याअंतर्गत दारू किंवा मादक पदार्थांचे उत्पादन, साठवण, विक्री किंवा सेवन यांवर पूर्णतः बंदी आहे. आणि मोहाच्या दारूचं वर्गीकरण जरी 'कंट्री अर्थात देशी दारू' म्हणून करण्यात येत असलं तरी तिला हा कायदा लागू होतो.










