‘तो जर थांबला तर माझं आयुष्य पण थांबणार बघा’
'पारी' स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरात ३०० गावांत जायचंय आणि इतर गोष्टी टिपत असतानाच ही मालिका तयार करायची आहे: गावातील एखाद्या दृश्याचं किंवा प्रसंगाचं छायाचित्र आणि त्याच छायाचित्राचं एक रेखाचित्र. हे 'पारी'वरील मालिकेतलं सहावं पान. चित्रावरची पट्टी सरकवून तुम्ही पूर्ण छायाचित्र किंवा रेखाचित्र पाहू शकता.
“हा बैल म्हणजे माझं आयुष्य आहे,” वयाच्या पंधराव्या वर्षापासून शेती करत असलेले महादेव खोत सांगतात. महादेव कोल्हापूर जिल्ह्याच्या लक्ष्मीवाडी गावचे रहिवासी आहेत. या फोटोत त्यांचा डावा पाय असा ताठ वेगळा दिसतोय. नऊ वर्षांपूर्वी शेतात एका विषारी काट्यामुळे संसर्ग झाला आणि त्यांचा डावा पाय कापून टाकावा लागला. आज ते कृत्रिम पाय आणि काठीच्या आधारे शेतातल्या कामांवर देखरेख ठेवतायत.
त्यांच्या भावाच्या मालकीच्या दोन एकरात ते भुईमूग आणि ज्वारी घेतात. त्यातला एक तुकडा त्यांच्या गावाहून १.५ किलोमीटरवर तर दुसरा तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचं गाव हातकणंगले तालुक्यात आहे.
“पाण्याची टंचाई आणि माझ्या पायाची इजा यामुळे गेल्या दहा वर्षांत शेतात माल कमी निघतोय. तसंही हे रान पडक आणि खडकाळ आहे,” ते सांगतात. (आता साठीचे असलेले) महादेव त्यांच्या बैलगाडीतून रोज सहा किलोमीटरचा फेरफटका मारून येतात, शेतात जातात आणि जनावरांसाठी चारा घेऊन येतात. “आता हाच मला जिथे जायचं तिथे घेऊन जातोय. तो जर का थांबला तर माझं आयुष्य पण थांबणार बघा.”
“१९८० च्या काळात मला दुसऱ्याच्या रानातला एक टन ऊस तोडायच्या कामाचे, १२ तासांच्या कामाचे १० रुपये मिळत होते,” ते सांगतात. आता त्याच कामाचे त्यांना २०० रुपये मिळाले असते. पण त्यांच्या पायाला इजा झाली आणि सगळंच संपलं. गेल्या साली तर त्यांच्या भावाच्या रानातूनही फारसं उत्पन्न मिळालं नाही. बरचसं पीक तर जनावरांनीच उद्ध्वस्त केलं. “सगळं जाऊन ३५ किलोचे दोन कट्टे भुईमूग झाला. तो काही मी विकला नाही. पुढल्या साली पेरायला आणि नातेवाइकाला द्यायला ठेवलाय.”
“माझी बायको, शालाबाई शेतात काम करते. दुसऱ्याच्या रानात मजुरीला जाते आणि फळंही विकते,” महादेव सांगतात. शालाबाईंचा दिवस पहाटे ५ वाजताच सुरू होतो. दिवसभरात त्या डोंगरातून फळंही गोळा करतात. महादेव मात्र शेतात १० वाजता जातात. लक्ष्मीवाडीच्या जवळ अल्लमा प्रभू डोंगरात त्यांचं शेत आहे. शालाबाईंची मजुरी आणि त्यांना मिळणारं ६०० रुपये अपंग पेन्शन यावरच त्यांचं सगळं भागतंय.
शालाबाईंच्या अंदाजानुसार त्या पन्नाशीच्या असतील. “त्यांच्या ऑपरेशनच्या आधी मी दिवसातले मोजून चार तास काम करत होते. आता मात्र मला १० तास काम करावं लागतंय, तर कसं तरी करून भागतं,” त्या म्हणतात. त्या [ऑक्टोबरपासून] अंदाजे दीड महिनाभर फळविक्री करतात. “त्यासाठी मला पार [३ किलोमीटर अंतरावरच्या] नारंदे गावापर्यंत चालत जावं लागतं. सकाळी सहा वाजताच कामासाठी घर सोडावं लागतं.” त्या शेजारच्या सावर्डे, आळते आणि नारंदे गावांमध्ये शेतात मजुरी करतात. “सात तास कामाचे १०० ते १५० रुपये मजुरी मिळते. गड्यांना २०० रुपये. बाया रानानी जास्त काम करतात, पण गडी माणसांना कायमच जास्त पैसे मिळतात.”
त्यांची दोन्ही मुलं लक्ष्मीवाडी सोडून दुसरीकडे रहायला गेली आहेत. एक जण रोजंदारीवर कामं करतो. दुसरा वेगळ्या गावात खंडाने जमीन करतो. “माझ्या ऑपरेशनला २७,००० रुपये खर्च आला. मला १२,००० रुपये कर्ज काढावं लागलं. माझ्या मुलांनी काही वर्षात ते फेडलं. अजून सुद्धा आम्हाला त्यांची पैशाची मदत असते,” महादेव सांगतात.
अनुवादः मेधा काळे