या वर्षी ११ ऑगस्ट रोजी, मध्य काश्मीरच्या बडगम जिल्ह्यातल्या झुगो-खरिएँचा २१ वर्षीय वाजिद अहमद आहनगर इतर तरुणांसोबत तोसामैदानला एका आगळ्या वेगळ्या उत्सवासाठी निघाला. या सुंदर कुरणांमध्ये एक जिवंत स्फोटक गवतात पडलेलं होतं आणि त्याचा अचानक स्फोट झाला. नवे कपडे परिधान करून घरातून बाहेर पडलेला वाजिद, त्याच्या वडलांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितल्याप्रमाणे “घोड्यावर स्वार राजपुत्राप्रमाणे” भासणारा वाजिद घरी आला तो मृतावस्थेत. इतर तिघांना किरकोळ जखमा झाल्या.
उत्सवाचं रुपांतर शोकात झालं. भूतकाळाचं भूत काश्मीरच्या मानगुटीवर कसं बसून आहे याचं हे आणखी एक उदाहरण.
एक वर्षभरापूर्वी, अगदी ऑगस्ट महिन्यातच, बडगमच्या खाग तालुक्यातल्या शुंगलीपोरा गावच्या मोहम्मद अक्रम शेखने मला या २०१५ पासून या कुरणांशी संबंधित उत्सवाची, जश्न-इ-तोसाची महती सांगितली होती. जम्मू आणि काश्मीर सरकारही पर्यटन उत्सवाचा भाग म्हणून याला प्रोत्साहन देतं.
त्याने सांगितलं की या खुल्या जागा पुन्हा एकदा लोकांच्या ताब्यात आल्या म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. गेली पाच दशकं हे मैदान गोळीबार मैदान म्हणून सैन्यदलाच्या ताब्यात होतं, आणि २०१४ मध्ये प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांनी ही जागा रिकामी केली.
जखमी होण्याच्या किंवा मरणाच्या भीतीशिवाय, दबावाशिवाय आणि पशुपालक म्हणून आपली उपजीविका सुरू ठेवण्याचं स्वातंत्र्य गावकऱ्यांनी साजरं केलं. ही कुरणं रिकामी करण्यात आली त्याचं चपखल वर्णन त्यांनी राहत की सास (सुटकेचा निःश्वास) असं केलं.
पण ऑगस्ट २०१८ मधल्या या घटना घडली आणि हे स्वातंत्र्य किती आभासी होतं आणि कोणत्याही प्रदेशाचं सैनिकीकरण झालं तर तिथला सगळा प्रदेश, आणि तिथल्या भूमीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि उपजीविका या सगळ्यावर कसा परिणाम होतो हेच पुन्हा दिसून आलं.









