शांती देवीला कोविड-१९ मुळे मृत्यू आल्याचं तिच्या मृत्यूच्या दाखल्यावर नमूद केलेलं नाही. पण ती ज्या परिस्थतीत मरण पावली त्यावरून दुसरं कोणतंच कारण नसणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.
२०२१ साली एप्रिल महिन्यात चाळिशी पार केलेली शांती देवी आजारी पडली. अख्ख्या देशभरात तेव्हा कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. लक्षणं दिसू लागली होतीः सुरुवातीला खोकला आणि सर्दी आणि दुसऱ्या दिवशी ताप. “त्या वेळी गावातलं जवळपास प्रत्येक माणूस आजारी होतं,” शांती देवीच्या सासू कलावती देवी, वय ६५ सांगतात. “आम्ही आधी तिला झोला छाप डॉक्टरकडे नेलं.”
उत्तर प्रदेशातल्या जवळपास प्रत्येक गावात औषधोपचार करणारे झोला छाप डॉक्टर आहेत. कुठलंही प्रशिक्षण नसलेले हे भोंदू डॉक्टर. पण महासाथीच्या काळात बहुतेकांनी याच डॉक्टरांकडे जाणं पसंत केलं कारण एक तर ते लगेच भेटतात आणि दुसरं म्हणजे सरकारी आरोग्ययंत्रणा अत्यंत खिळखिळी आहे. “आम्हाला सगळ्यांना भीती वाटत होती त्यामुळे कुणीच हॉस्पिटलला गेलं नाही,” कलावती सांगतात. त्या वाराणसीच्या दल्लीपूर गावात राहतात. “आम्हाला त्या [विलगीकरण] सेंटरला पाठवतील अशी भीती वाटत होती. आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आजारी माणसांची तोबा गर्दी होती. खाटा नव्हत्या. त्यामुळे झोला छाप सोडून कुणाकडे जाणार?”
पण हे ‘डॉक्टर’ अप्रशिक्षित आहेत, अपात्र आहेत आणि त्यामुळेच गंभीर रुग्णांवर उपचार करण्यास लायक नाहीत.
झोला छाप डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर तीन दिवसांनी शांतीला श्वासाला त्रास व्हायला लागला. तेव्हा मात्र कलावती, शांतीचा नवरा मुनीर आणि घरची बाकी मंडळी घाबरून गेली. वाराणसीच्या पिंडरा तालुक्यातल्या आपल्या गावाहून २० किलोमीटरवर असलेल्या एका खाजगी दवाखान्यात त्यांनी शांतीला नेलं. “हॉस्पिटलच्या लोकांनी तिची अवस्था पाहिली आणि म्हणाले की फार काही आशा वाटत नाही. मग आम्ही घरी येऊन झांड-फूक केली,” कलावती सांगतात. आजार निघून जावा म्हणून पूर्वीपासून लोक अशा कर्मकांडाचा आधार घेत आले आहेत.
त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि त्याच रात्री शांती मरण पावली.








