“आम्ही छुप्या मार्गाने आलो. करणार काय? आता निदान आमच्याकडे माल तर आहे, आता घरी बसून पाट्या विणून ठेवू,” तेलंगणाच्या कांगल गावातल्या बुरुडांचा एक गट सांगत होता. आणि त्यांचा हा छुपा मार्ग कोणता? असा जिथे पोलिसांच्या आडकाठ्या नाहीत, किंवा गावकऱ्यांना काट्याकुट्यांनी रस्ता बंद केलेला नाही.
४ एप्रिल रोजी नेलीगुंदरशी रामुलम्मा, सोबत चार बाया आणि एक गडी असे सगळे मिळून सकाळी ९ वाजता रिक्षात बसले. कांगलपासून सात किलोमीटरवर असणाऱ्या वेल्लीदंडुपाडु या पाड्यावरून शिंदीच्या झापा आणायला ते निघाले. यापासूनच ते पाट्या-दुरड्या विणतात. ते एरवी माळरानांवरून किंवा टोपल्यांच्या बदल्यात एखाद्या शेतकऱ्याच्या झाडाच्या झापा गोळा करून आणतात.
मार्च ते मे हा कांगलच्या बुरुडांसाठी टोपल्यांच्या विक्रीच्या दृष्टीने फार कळीचा काळ असतो. हे बुरुड येरुकुला समाजाचे असून तेलंगणामध्ये त्यांची नोंद अनुसूचित जमातींमध्ये होते. या काळात कडक ऊन असल्यामुळे या झापा लवकर सुकतात.
एरवी वर्षभर ते शेतात मजुरी करतात, जिथे दिवसाला २०० रुपये मिळतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कापूस वेचणीला येतो तेव्हा महहिनाभर अधून मधून दिवसाला ७००-८०० रुपये मजुरी देखील मिळू शकते. अर्थात किती काम उपलब्ध आहे, त्यावर ते अवलंबून असतं.
या वर्षी मात्र कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे पाट्या विकून होणारी त्यांची कमाई पूर्णच थांबली. “ज्यांच्याकडे पैसा आहे ते चार घास खातायत. आम्ही मात्र नाही. त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. नाही तर कोणाला हौस आहे?”







