संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चंदेरी आणि सोनेरी काठाचा, आरशांनी सजवलेला घागरा लेवून निर्मला देवी उदयपूरच्या बागोर की हवेलीच्या रंगमंचावर अवतरतात. मुलगी तारा आणि इतर आठ जणींसोबत - ज्या सगळ्या एकमेकींच्या नात्यातल्या आहेत – त्या चारी, घूमर, भवाई आणि इतर काही नृत्य प्रकार सादर करू लागतात.
“रोज, त्याच ऊर्जेने नाचणं काही सोपं नाही,” त्या म्हणतात. जेव्हा तुम्ही तोंडात तलवार धरलेली असते, किंवा पेटता दिवा ठेवलेली कळशी तुमच्या डोक्यावर असते किंवा काचेच्या तुकड्यांवर तुमची पावलं थिरकत असतात आणि डोक्यावर घडे तोलत तुम्ही नाचत असता तेव्हा तर हे खचितच सोपं नाही. तरीही निर्मला आणि त्यांच्या चमूतल्या इतर स्त्रिया ज्यात तिची जाऊ सीमा देवी आणि सासू भमरी बाईदेखील आहेत – रोज संध्याकाळी हे करतायत. “माझी जाऊ डोक्यावर ११ घडे घेऊन नाचते आणि नाच संपतो तेव्हा ती नखशिखान्त घामाने डबडबलेली असते,” निर्मला सांगतात. “आणि तरीही चेहऱ्यावरचं हसू ढळत नाही आणि पुढच्या नृत्यासाठी तयार होण्यासाठी लगेच कपडे बदलायच्या खोलीत जाते.”
पण नाच करणाऱ्यांचा हा कमाद समुदाय (अनुसूचित जातीत समाविष्ट) सर्वात जास्त ओळखला जातो तो तेरा ताली नृत्यासाठी. हवेलीतल्या तासभराच्या नृत्यातला हा १०-१५ मिनिटाचा तुकडा या भागातले एक थोर पुरुष बाबा रामदेव यांना अर्पण केला जातो. या समुदायात अशी कथा सांगितली जाते की बाबा रामदेवांनी वंचितांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य वेचलं.







