“जेव्हा राजकारणी आमच्या शहरात येतात ना तेव्हा त्यांना थांबण्याचीही सवड नसते. नुसते हवेत हात हलवायचे आणि गाड्यांमधून भुर्रकन निघून जायचं. आम्हाला त्यांच्यापासून ५० फुटावर अडवलं जातं,” पुतण्णा म्हणतात.
कर्नाटकाच्या तुमकूर जिल्ह्यातल्या मधुगिरी शहरात गेली ११ वर्षं पुत्तना मैला सफाईचं काम करतायत. या काळात दोन निवडणुका पार पडल्या आणि तिसरी होऊ घातली आहे. या आठवड्यात तुमकूरमध्ये मतदान होणार आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होतोय.
या मतदारसंघातली लढाई दोन दिग्गजांमध्ये होणार आहेः भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, ७७ वर्षीय विद्यमान खासदार जी. ए. बसवराज आणि काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) या सत्तेत असलेल्या आघाडीचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान, ८६ वर्षीय एच. डी. देवेगौडा.
या दोघांमध्ये उजवं कोण असं विचारल्यावर मात्र मधुगिरीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला फार काही उत्साही प्रतिक्रिया मिळत नाही. त्यांच्यातले बहुतेक जण ४५ वर्षीय पुतण्णांसारखे मडिगा दलित या शोषित जातीचे आहेत आणि त्यांच्यासाठी मैलासफाईशिवाय फारसे काही पर्याय उपलब्ध नाहीत. (या लेखासाठी ज्यांच्याशी संवाद साधला त्या सर्वांनी केवळ त्यांचं पहिलं नाव वापरण्यात यावं असं सांगितलं.) ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नाटक राज्य सफाई कर्मचारी आयोगाने केलेल्या अभ्यासानुसार कर्नाटकातले सर्वात जास्त मैला सफाई कामगार तुमकूरमध्ये आहेत. अमानवी काम, अपुरं वेतन आणि वर्षं उलटली तरी डोक्यावर छप्पर नाही ही काही कारणं आहेत ज्यामुळे त्यांचा राजकीय नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही.








