“त्यांनी मला मारून टाकलं असतं...” अरुणा म्हणाल्या, वय वर्षे २८. तिच्या सहा वर्षांच्या मुलीला शेजारी खेळताना पाहून थक्क झाल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. ‘ते’ अरुणाच्या कुटुंबातील सदस्य होते आणि ती अशी थक्क का झाली हेही ते समजू शकले नाहीत. “मी गोष्टी उडवून लावीन. मी घरी बसणार नाही. आमच्या घराजवळ कुणीही येणार नाही..."
तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यात तिच्या घराजवळच्या टेकड्यांवर ती अनेकदा भटकायला जायची. पण ती कुणाला इजा पोहोचवेल या भीतीने काही जण तिच्यापासून दूर पळायचे, तर काही जण तिच्यावर दगडफेक करायचे. तिचे वडील तिला घरी परत घेऊन यायचे आणि तिचं बाहेर जाणं बंद करण्यासाठी कधी कधी तिला खुर्चीला बांधून ठेवायचे.
अरुणा (नाव बदललं आहे) १८ वर्षांची होती, जेव्हा तिला स्किझोफ्रेनिया आजाराचं निदान झालं. ती कशी विचार करते, तिला काय वाटतं आणि ती कशी वागते या साऱ्यावर या आजाराचा परिणाम होतो.
कांचीपुरमच्या चेंगलपट्टू तालुक्यातील कोंडांगी गावातील दलित वस्तीत, ती तिच्या घराबाहेर बसली आहे. मधल्या कठीण दिवसांबद्दल बोलताना अरुणा मध्येच थांबते. अचानक ती लांब जाते. गुलाबी नाईटी घातलेली आणि बारीक कापलेल्या केसांशी खेळणारी, उंचपुरी, सावळी अरुणा चालता चालता वाकते. गवताने शाकारलेल्या आपल्या एका खोलीत शिरते आणि डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) आणि दोन गोळ्यांच्या पट्ट्या घेऊन परत येते. त्या गोळ्या दाखवत ती म्हणते, “ही (गोळी) मला झोपायला लावते. दुसरी मज्जासंस्थेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आहे,” “आता मला चांगली झोप येते. औषधं आणण्यासाठी मी दर महिन्याला सेमबक्कमला [प्राथमिक आरोग्य केंद्र] जाते.”
जर शांती शेषा नसत्या तर कदाचित अरुणाच्या आजाराचं निदानच झालं नसतं.



