कोणत्याही फडात तमाशात नाचणाऱ्या बायांना – या फडात १६ जणी आहेत – सगळ्यात जास्त पैसे दिले जातात, मंगलाताईंचे थोरले चिरंजीव आणि फडाचे मॅनेजर, अनिल बनसोडे सांगतात. “२०१६-१७ च्या हंगामात, सगळ्यात जास्त पगार ३०,००० रुपये होता, तोही तमाशात नाचणाऱ्या बाईला,” ते सांगतात. त्यांच्यामुळेच सगळ्यात जास्त गर्दी गोळा होते आणि त्यांचंच सगळ्यात जास्त कौतुकही होतं. पण आठ महिने फडाबरोबर फिरायला तयार असणाऱ्या नृत्य येणाऱ्या बाया मिळणं सोपं नसतं. “त्यामुळे चांगला पगार हाच त्यांना टिकवून ठेवायचा एकमेव मार्ग असतो.”
या हंगामात अनेक गाण्यांमध्ये सुषमा माळी मुख्य कलावंत होती. तिने १२-१३ वर्षाची असतानाच तमाशात काम करायला सुरुवात केली. आपल्या आईला फडावर नाचताना पाहतच ती मोठी झाली. सुषमाने तमाशात यायचा निर्णय घेतला तो काही तिच्या आईला फारसा पसंत नव्हता. आपल्यासारख्याच हाल अपेष्टा तिलाही सोसाव्या लागू नयेत असंच त्यांना वाटत होतं. पण सुषमाने काही निर्णय बदलला नाही कारण तमाशातलं आर्थिक स्वातंत्र्य तिला खुणावत होतं. “माझा नवरा शेतकरी आहे. त्यालाही मी तमाशात काम केलेलं आवडत नाही. पण मला माझ्या आठ वर्षांच्या भावाला आणि तीन वर्षाच्या मुलीला मोठं करायचंय,” ती म्हणते. सुषमालाही आपल्या मुलीने तमाशात यावं असं मुळीच वाटत नाही. आपण तमाशात नाचतो हेही तिने तिला सांगितलेलं नाही.
आई-वडील किंवा मोठी भावंडं तमाशात काम करतात म्हणून अनेक जण फडात येतात. शेतमजुरीपेक्षा तमाशात कमाईचा जास्त भरवसा असतो. फडात असल्यामुळे त्यांना कलावंत म्हणून ओळखलं जाईल आणि त्यांची समाजातली पत वाढेल असंही काही जणांना वाटतं.
सांगली जिल्ह्याच्या दुबळ धुळगावच्या शारदा खाडेंसारखी इतर काही कुटुंब फडासोबतच राहतात. शारदा नर्तकी आहेत आणि वगात काम करतात. त्यांचा एक मुलगा ढोलकी वगैरे वाजवतो आणि दुसरा वायरमन आहे. त्यांचा नवरादेखील नट आहे. त्यांच्यासाठी तमाशा हाच जीविकेचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. शेतमजुरी करणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना दिवसाला जास्तीत जास्त २०० रुपये मिळतात आणि रोज काम मिळेलच याचीही कसलीच खात्री नसते.
पण तमाशातल्या नियमित कमाईसाठी बरंच काही गमवावंही लागतं. दर रोज नव्या गावात तंबू ठोकायचा हे काही सुखाचं काम नाहीये, शारदा म्हणतात. आणि कामाच्या वेळांना काही धरबंधच नसतो, रात्री उशीरापर्यंत काम, जेवणाच्या वेळा नाहीत आणि बहुतेक वेळा घाणीत रहायला लागतं.