“त्यांना इथे शाळेत आणायचं हेसुद्धा मोठं आव्हानच आहे.”
मुख्याध्यापक सिवजी सिंग यादव यांचे शब्द पोकळ नाहीत. गेल्या ३४ वर्षांच्या अनुभवाचं वजन आहे त्यांना. ‘मास्टरजी’ डाबली चापोरी बेटावरची एकमेव प्राथमिक शाळा चालवतात. आसामच्या माजुली जिल्ह्यातल्या, ब्रह्मपुत्रा नदीमधल्या या बेटावर ६३ कुटुंबं राहतात. आणि या घरांमधली जवळपास सगळीच मुलं याच शाळेत जातात.
धोनेखाना मझदूर लोअर प्रायमरी स्कूल या शाळेतल्या एकमेव वर्गखोलीत सिवजी आपल्या टेबलापाशी बसले होते. हसऱ्या चेहऱ्याने आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहत होते. आणि ६ ते १२ वर्षांचे, पहिली ते पाचवी इयत्तेत शिकणारी ही सगळी मुलं त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. “या लहानग्यांना शिकवायचं, शिक्षण द्यायचं हे खरं तर मोठं आव्हान आहे,” ते म्हणतात. “ते तर पळ काढायलाच बसलेत ना!”
बोलत बोलत ते भारतीय शिक्षण पद्धतीचा मागोवा घेतात पण त्या आधी क्षणभर थांबून ते मोठ्या विद्यार्थ्यांपैकी एकाला हाक मारतात. राज्य शासनाकडून आसामी आणि इंग्रजी भाषेतली पुस्तकांचं एक खोकं आलंय ते त्याला उघडायला सांगतात. नवी पुस्तकं पाहून पोरं त्यात रमणार आणि आमच्याशी बोलायला आपल्याला उसंत मिळणार याची त्यांना पुरेपूर कल्पना होती.
“महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला सरकार जितका पगार देतं ना, तितका प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाला द्यायला पाहिजे. पाया भरणीचं काम आम्हीच करतो की नाही,” ते म्हणतात. अगदी सुरुवातीच्या शिक्षणाचं महत्त्वच ते विषद करतात. पण, त्यांच्या मते पालकांना मात्र प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व नाहीये. त्यांच्यासाठी माध्यमिक शाळा तेवढी महत्त्वाची आहे. आणि हा गैरसमज दूर करण्याचा ते अथक प्रयत्न करत असतात.

















