जेमतेम बारा वर्षांची होती जमलो. फेब्रुवारीत कधी तरी ती तेलंगणातल्या मिरचीच्या शेतावर काम करण्यासाठी गेली. टाळेबंदी लागल्यावर बरोबरच्या इतर मजुरांबरोबर तीही चालत घरी यायला निघाली आणि सतत तीन दिवस चालल्यावर रस्त्यातच १८ एप्रिलला तिचा मृत्यू झाला.
‘‘आमच्या इतर गाववाल्यांबरोबर तीही गेलीय हे माहितीच नव्हतं आम्हाला. दुसर्या दिवशी कळलं ते,’’ सुकमती मडकम, जमलोची आई म्हणाली. हे कुटुंब मुरिया या आदिवासी समाजाचं आहे.
छत्तीसगढमधल्या बस्तर भागातल्या बिजापूर जिल्ह्यातलं आदेड हे जमलोचं गाव. या गावी गावातल्या ११ मजुरांबरोबर जमलो परत येत होती. यातली काही मुलं तेलंगणातल्या मुलुगु जिल्ह्यातल्या कन्नईगुडेम गावाजवळच्या शेतात कामाला गेली होती. (वरचा कव्हर फोटो याच रस्त्यावरून ७ मे रोजी जाणार्या अशाच एका गटाचा आहे.) तिथे ही मुलं मिरच्या खुडतात, त्याचे त्यांना दिवसाला २०० रुपये मिळतात किंवा आधी ठरल्याप्रमाणे मिरच्यांची पोती मिळतात. (वाचाः Children of the chilli fields)
‘‘जमलो तिच्या मैत्रिणी आणि इतर काही गावकर्यांबरोबर कामाला गेली होती. पण काम थांबलं आणि त्यांनी गावी परतायचं ठरवलं. मुळुगु जिल्ह्यातल्या पेरुरू गावाहून ते निघाले तेव्हा तिने मला फोन केला होता. शेवटचा फोन आला तो तिच्याबरोबर असणार्या आमच्या गाववाल्यांचा, माझ्या लेकीच्या मृत्यूची बातमी देणारा...’’ अंदोराम, जमलोचे वडील सांगतात. वनोपज गोळा करणं, छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर भात, हुलगे आणि इतर पिकं, रोजगार हमीचं काम ही अंदोराम आणि सुकमती यांच्या उत्पन्नाची साधनं आहेत. आदेडच्या बहुतेक सर्व आदिवासींसारखं यावरच त्यांचं घर चालतं.
‘‘दोन महिन्यांपूर्वी जमलो मजुरी करायला तेलंगणाला गेली. पण लॉकडाऊन झाल्यावर काम बंद झालं. मजुरांना आता काहीही करून आपल्या गावी परतायचं होतं. त्यांच्याकडचे उरलेसुरले सगळे पैसे संपले होते. त्यांच्या कंत्राटदारानेही त्यांना गावी परत जा, असंच सांगितलं होतं,’’ पुष्पा उसेंडी-रोकडे सांगते. बिजापूरची पुष्पा पत्रकार आहे. जगदलपूरहून निघणार्या एका वर्तमानपत्रासाठी ती काम करते. ती स्वत: गोंड आदिवासी आहे.






