“अरे बाप रे!” ती ओरडली. हातातला फिल्टर कॉफीचा कप खाली ठेवला. दोन्ही हातांनी फोन धरून तिने ती बातमी आपल्या नवऱ्याला मोठ्याने वाचून दाखवली. तो ऑफिसची मेल लिहीत होता. “महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ एका मालवाहू गाडीखाली १६ स्थलांतरित कामगारांचा चिरडून मृत्यू – तू पाहिलंस का हे? काय चाललंय काय हे सगळं?” काही क्षणांनी सगळं बधिर झालं आणि आता गार होऊन गेलेली कॉफी उरलेल्या बातमीसोबत घोटघोट पिता येत होती. “बाप रे! अरे किती माणसं आहेत ही – आणि कुठकुठनं आली होती?” तिच्या आवाजातलं आश्चर्य आता मगाइतकं राहिलं नव्हतं.
“यातले काही उमरियाचे होते, म्हणे. मनू, गेल्या डिसेंबरमध्ये आपण तिथे गेलो होतो ना?” त्या सुट्टीचा उल्लेख ऐकून त्याने क्षणभर त्या ईमेलच्या जंजाळावरून नजर हटवली आणि परत तो आपल्या कामाला लागला. “हो,” तो म्हणाला, “बांधवगड अभयारण्य. मध्य प्रदेशाच्या सगळ्यात मागास जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यातलं. तिथून उठून हे लोक जालन्याला कामाला आले, ते बरोबरच आहे. पण रुळावर झोपायचं? इतका मूर्खपणा कुणी कसा काय करू शकतं?”
“अरे, किती सुंदर होतं ते,” ती वेगळ्याच जगात रममाण झाली होती, “आठवतो, तो शेषशैय्या? विष्णूची ती भव्य मूर्ती आणि शांत झरा, सभोवताली हिरवे कंच सालवृक्ष... एकदा हा लॉकडाउन संपला ना की आपण परत तिथे जायलाच पाहिजे...”



