मक्तुंबे एम. डी. राचेनहळ्ळीच्या एका झोपडपट्टीत राहते. कोविड-१९ ची टाळेबंदी सुरू आहे आणि आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं याचा घोर तिला लागून राहिलाय. “माझ्या नवऱ्याला आठवड्यातून एकदा मजुरी मिळायची. तेव्हाच आम्ही जाऊन किराणा घेऊन यायचो. गेल्या दोन आठवड्यांपासून कुणालाही पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे आम्ही काहीच सामान आणलेलं नाहीये,” ३७ वर्षांची मक्तुंबे सांगते. बंगळुरूत टाळेबंदी लागल्यानंतर १० दिवसांनी आम्ही भेटलो होतो. मक्तुंबे गृहिणी आहे आणि तिचा नवरा रंगकाम करतो. एरवी त्याची आठवड्याला ३,५०० रुपयांची कमाई होती, पण २५ मार्च रोजी टाळेबंदी लागली आणि तेव्हापासून त्याला काम मिळालेलं नाहीये.
या जोडप्याला तीन मुलं आहेत. १० वर्षांपूर्वी ते कामाच्या शोधात बंगळुरूला स्थलांतरित झाले. कर्नाटकाच्या विजयपुरातल्या (पूर्वीचं विजापूर) तालिकोटा (इथे लोक याचा उच्चार तालिकोटी असा करतात) या गावातून ते आले. मक्तुंबेच्या नवऱ्याला मौलासाब दोडामणीला दर रविवारी मजुरी मिळायची आणि त्या कमाईवरच हे कुटुंब अवलंबून आहे. “आम्ही आठवड्यातून एकदा सामान भरायचो – पाच किलो तांदूळ, एक किलो तेल आणि बाकी इतर गोष्टी – त्यातच भागवत होतो. आता ते थांबलं. आम्हाला बाहेर जायलाच बंदी आहे. अन्नासाठी आम्हाला बाहेर जायचंय.”
आम्ही ४ एप्रिल रोजी जेव्हा भेटलो तेव्हा उत्तर बंगळुरूतल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या या वस्तीतले अनेक त्यांच्या अपेष्टा सांगत होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदत योजनेअंतर्गत शासनाने अनुदान दिलेलं धान्य मिळण्यासाठी यांच्यापैकी कुणीही पात्र नाहीये. अनेकांकडे रेशन कार्ड नाही. काहींकडे आहे, पण ते गावाकडच्या पत्त्यावर आहे, असं ३० वर्षांची माणिक्यम्मा सांगते. ती मूळची उत्तर कर्नाटकातल्या रायचूर जिल्ह्यातली आहे. “ही कार्डं इथे बंगळुरूत चालत नाहीत,” ती सांगते.
“आम्ही आता कामं मिळवण्यासाठी धडपडतोय. खूपच अवघड झालंय. लेकरं आहेत, भाडं भरायचंय. हे सगळं आम्ही कसं करायचं आता?” ती विचारते. टाळेबंदी लागण्याआधी माणिक्यम्मा आणि तिचा नवरा हेमंत बांधकामावर काम करत होते. ते सात वर्षांपूर्वी बंगळुरूला आले आणि त्यांना चार अपत्यं आहेत.
२७ वर्षांची लक्ष्मी एन. देखील रायचूरची आहे आणि माणिक्यम्मा आली साधारण तेव्हाच तीदेखील या शहरात आली. टाळेबंदी सुरू होण्याआधी ती उत्तर बंगळुरूतल्या बांधकामांवर काम करत होती. “आम्ही सिमेंट तयार करतो आणि खडी फोडतो. या कामाचे दिवसाला ३०० रुपये मिळतात,” ती सांगते. राचेनहळ्ळीत ती एकटीच एका कच्च्या खोलीत राहते. त्याचं तिला महिन्याला ५०० रुपये भाडं भरावं लागतं.


