तीरा आणि अनीता भुईया यंदाच्या खरिपात चांगलं पीक यावं यासाठी हातघाईवर आले आहेत. त्यांनी धान आणि थोडा मका पेरला आहे, आणि पिकं कापणीला आली आहेत.
यंदा चांगला माल येणं त्यांच्यासाठी आणखीच गरजेचं झालं आहे, कारण वर्षातले सहा महिने त्यांना काम देणाऱ्या वीटभट्ट्या मार्चमध्ये सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे बंद पडल्या आहेत.
"मागच्या वर्षी मी शेती करून पाहिली, पण कमी पाऊस अन् किडीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं," तीरा म्हणतात. "आम्ही सहा महिने शेती करतो, पण हाती काहीच पैसा येत नाही," अनीता म्हणतात.
तीरा, वय ४५, आणि अनीता, वय ४०, महुगावांच्या दक्षिण टोकाला असलेल्या भुईया तढी नावाच्या अनुसूचित भुईया जातीच्या वस्तीमध्ये राहतात.
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील चैनपूर तालुक्यामधील या गावातलं हे कुटुंब २०१८ पासून प्रत्येक खरीप हंगामात जमीन बटईने घेतात, जिला स्थानिक बोलीत बटिया म्हणतात. या पद्धतीत खंडकरी आणि जमिनीचे मालक उत्पादनाचा निम्मा-निम्मा खर्च करतात, आणि प्रत्येकाला पिकातला अर्धा हिस्सा मिळतो. बटईदार सहसा त्यांच्या वाट्याला येणारं बहुतेक पीक स्वतःच्या वापरासाठी ठेवतात, आणि कधीकधी थोडा भाग बाजारात विकतात.






