हिवाळ्याची थंडगार सकाळ. नैन राम बाजेला मुनसियारी तहसीलमधल्या जैती गावातल्या आपल्या घराच्या छतावर बसले आहेत. त्यांच्या मागे कपड्यांची वळण, वर हलकेसे ढग आणि दूर अंतरावर पंचाचुली पर्वतरांगा. विळ्यासारखं गोल पातं असलेल्या एका अवजाराने ते रिंगल किंवा पहाडी रिंगल या हिमालयातील बांबूच्या बारीक पट्ट्या काढतायत. या विळ्याला पहाडी भाषेत बरंश म्हणतात. शून्याखाली तापमान असणाऱ्या या हवेतही ते हातमोजे किंवा पायमोजे घालत नाहीत. बोचरा वारा त्यांच्या त्वचेला झोंबतोय. पण नैन राम यांचं काम चालूच आहे, अविरत.
“मी काल हा रिंगल पहाडातून आणलाय. यातून दोन टोपल्या तरी होतील,” माझ्याकडे किंवा कॅमेऱ्याकडे बिलकुल न पाहता ते सांगू लागतात. वयाच्या १२ वर्षापासून नैन राम बांबूच्या वस्तू बनवतायत. त्यांनी ही कला त्यांच्या वडलांकडून शिकली, पण यात इतका कमी पैसा आहे की त्यांच्या वडलांना आपल्या मुलानी यात पडावं असं काही वाटत नव्हतं. तर, ते सांगतात, “लहानपणी मी दुसऱ्याच्या जागेतून बांबू चोरून आणायचो आणि त्याच्या काय काय वस्तू बनवायचो, फुलदाण्या, केराच्या टोपल्या, पेनस्टँड आणि गरम चपात्या ठेवायला टोकऱ्या. चिक्कार.”
आता ५४ वर्षांचे असणारे नैन राम यांच्या मते ते केवळ त्यांची बोटं आणि विळ्याच्या मदतीने रिंगलपासून काहीही बनवू शकतात. “माझ्यासाठी हा मातीच्या गोळ्यासारखा आहे. त्यापासून अगदी काही पण बनू शकतं,” काही पातळ आणि काही जाड पट्ट्या जमिनीवर ठेवता ठेवता ते म्हणतात. “हे काही एखाद्या कामगाराचं काम नाहीये – हे कौशल्य आहे. तुम्हाला हे शिकून घ्यावं लागतं आणि मुळात चिकाटी पाहिजे – एखाद्या कलेसारखी.”









