त्यांच्यापैकी एकजण वगळता इतर सगळे करोनाच्या चाचणीत निगेटीव्ह आढळून आले, पण त्याने काहीही फरक पडला नाही. गावकऱ्यांच्या संमतीने सरपंचांनी एक हुकूम काढला. या कुटुंबाला महिनाभर घराच्या बाहेर पडता येणार नाही – जरी क्वारंटाईनचा अनिवार्य कालावधी १४ दिवसांचाच असला तरीही. त्यांच्यापैकी एकाला विषाणूची लागण झाली होती.
दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आलेली ही पहिलीच घटना होती. आणि तो तबलिघी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन पानिपत, हरियाणा येथून परतला होता.
एकीकडे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद येथील उमरग्याच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते पण त्याच्या कुटुंबियांना मात्र एक प्रकारे नजरकैदेतच ठेवण्यात आलं होतं. "आम्हाला पिकं काढता आली नाहीत," ३१ वर्षीय मोहम्मद सलमान (नाव बदललेलं) सांगतो. "कापणीला आलेलं पीक वाया चाललं होतं तरी आम्हाला घरातच राहावं लागलं. काही पिकाची जनावरांनी नासधूस केली, अन् उरलेलं वाळून गेलं. आम्ही काहीच वाचवू शकलो नाही. ५०,००० रुपयांचं नुकसान झालं."
२४ मार्च रोजी सलमान पानिपतहून परतला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कोविड-१९ चा प्रसार थांबवण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली होती, त्याच दिवशी. त्याच आठवड्यात दिल्लीतील अधिकाऱ्यांना १९२६ साली स्थापन झालेल्या शहरातील जुन्या इस्लामी संघटनांपैकी एक असलेल्या तबलिघी जमातच्या मरकझ निझामुद्दिन या मुख्यालयात सुमारे २,००० लोक वास्तव्याला असल्याचं आढळून आलं. ते दिल्लीत १३ ते १५ मार्च दरम्यान झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यायला आले होते, जी संसर्गाचा हॉटस्पॉट बनली होती. या घटनेनंतर या संपूर्ण समुदायाला बदनाम करण्याची एक काळी मोहीम सुरू झाली.








