“मी बांधलेली प्रत्येक झोपडी कमीत कमी ७० वर्षं टिकते.”
कोल्हापूरच्या जांभळी गावात राहणारे विष्णू भोसले झोपडी उभारण्यात माहीर आहेत. त्यांचं हे कौशल्य अगदी आगळं वेगळं आहे.
लाकडी चौकट आणि वरती झापांचं छप्पर असलेली झोपडी बांधण्याचं हे कसब विष्णूकाका आपल्या वडलांकडून म्हणजे गुंडू भोसलेंकडून शिकले. आतापर्यंत त्यांनी किमान १० झोपड्या एकट्याने बांधल्या आहेत तर तेवढ्याच झोपड्या बांधायला मदत केली आहे. “आम्ही उन्हाळ्यातच झोपड्यांची कामं करायचो कारण तेव्हा रानं रिकामी असायची,” ते सांगतात. “झोपडी बांधायची म्हणून लोकं पण उत्साहात असायची.”
१९६० च्या दशकापर्यंत जांभळीत अशा शंभरेक झोपड्या असल्याचं विष्णूकाकांना आजही आठवतंय. दोस्त मंडळी एकमेकांच्या मदतीला यायची आणि जवळपासचंच साहित्य आणून झोपड्या बांधायची. “झोपडी बांधाया रुपया कधी खर्च केलो नाही. पैसा होताच कुणाकडं?” ते म्हणतात आणि पुढे सांगतात, “लोकं तीन तीन महिने थांबाया तयार असायची. सगळं साहित्य मनाजोगतं जमल्याशिवाय काम सुरू व्हायचं नाही.”
एकविसावं शतक उजाडेपर्यंत ४,९३६ लोकसंख्येच्या (जनगणना, २०११) लाकडी, झापाच्या झोपड्यांची जागा सिमेंट, वीट आणि पत्र्याच्या खोल्यांनी घेतली होती. त्या आधी झोपड्यांवर खापरी किंवा कुंभारी कौलं असायची, जी गावातले कुंभारच बनवत असत. त्यानंतर यंत्रावर तयार झालेली बंगलोर कौलं आली जी जास्त मजबूत आणि टिकाऊ होती.
झोपडीवर झापाचं छत घालायला जितके कष्ट लागतात त्या मानाने कौलं बसवणं सोपं आणि झटपट होतं. त्याची जास्त निगाही राखावी लागत नसे. सिमेंट आणि विटांचा वापर करून पक्की घरं बांधायला सुरुवात झाली आणि झोपडी बांधण्याच्या कलेला उतरती कळा लागली. जांभळीतल्या लोकांनीही आपल्या झोपड्या सोडून नव्या प्रकारची घरं बांधायला सुरुवात केली आणि आज गावात बोटावर मोजता येतील इतक्याच झोपड्या उरल्या आहेत.
“आजकाल गावात झोपडीच पहायला मिळणं दुरापास्त झालंय. पुढल्या काही वर्षात जुन्या पद्धतीच्या झोपड्या दिसेनाशा होणार. कुणाला त्याची निगा राखायची नाही,” विष्णूकाका म्हणतात.





























