कुडाळकरांवरचं भीतीचं मळभ भलेही निवळलं असेल पण वनखात्यावर मात्र योग्य नियोजनाच्या अभावाचा ठपका ठेवला गेलाय्. प्रशिक्षणाच्या काळात, फेब्रुवारीत, यातील एक हत्ती दगावला. तो ४० वर्षांचा होता, हत्तींचं सरासरी आयुष्य ८० वर्षे असतं. कदम म्हणतात की हा नैसर्गिक मृत्यू होता, "आम्ही त्याला इतर दोघांसारखंच वागवलं होतं." पण स्थानिक पत्रकार चंदू शेडगे सांगतात की, "हत्तींच्या आरोग्याविषयी जाणकार असा कुणी डॉक्टर या भागात नाही. गरज पडली तर म्हैसूरहून तो बोलवावा लागतो."
हत्ती ही धोक्यातील प्रजाती असल्यामुळे तर त्यांचं संरक्षण अधिकच महत्त्वाचं ठरतं. एका हत्तीला दिवसाला २०० किलो चारा आणि पाला इ. अन्न आणि तेवढंच पाणी लागतं. या शिवाय त्यांना चिखल/दलदल प्रिय असते. त्यांच्या त्वचेवर घर्मग्रंथी नसतात त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्यांना चिखलात डुम्बावे लागते. तापमान ४० अंशांवर पोचल्यावर त्यांच्यासाठी क्रालमध्ये पुरेशी दलदल उपलब्ध करून देणे सोपे नसते. "खरंच हत्तींची काळजी घेण्याची क्षमता आमच्याकडे आहे का हा प्रश्न आम्ही स्वत:ला विचारायला हवा. माझ्या मते, आमच्याकडे मनुष्यबळ देखील कमीच आहे," शिंदे म्हणतात.
पुण्याचे वनाधिकारी सुनील लिमये यांनी हत्तीच्या दु:खद मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत म्हटले, "आम्ही यापासून धडा शिकू आणि भविष्यात हत्तींच्या सर्व गरजा पुरवून आम्ही आमचं नाव राखू."
पण त्यानंतर लौकरच, एका शनिवारी, उरलेल्या दोन हत्तींपैकी एकाने दुपारभर चित्कार करून आंबेरी गावाची शांतता मोडली. त्याला काहीतरी होत होतं आणि तो कोसळला, त्याचे डोळे तांबारले होते. ७-८ जण कष्टाने त्याला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करू लागले. अतिशय करूण दृश्य होतं ते. तो महाकाय गजराज इतका दुबळा झाला होता की त्याचे पाय त्याचं वजन पेलू शकत नव्हते. मोठ्या दोरखंडाच्या मदतीने लोक त्याला उठवू पाहत होते पण अर्ध्यातच तो कोसळत होता. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर तो निश्चल पडून राहिला; एखाद्या हतबल योद्ध्यासारखा.
सगळीकडे गडबड गोंधळ माजला. स्थानिक पशुवैद्यांना बोलावलं, त्यांनी सलाईन चढवली. कुणी त्याला केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर कुणी नळी लावून त्याच्या अंगावर पाणी फवारण्याचे प्रयोग केले. बर्फही लावून पाहिला. पण दिवसभर तो काही उठला नाही आणि त्याचा जोडीदार असहाय्यपणे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी तो उभा राहिला खरा पण ते समाधान तात्पुरतंच होतं. महिन्याभरातच, २९ मेला तो मरण पावला.
शिंद्यांच्या मते, "क्राल साठी एक पूर्णवेळ हत्तींचा तज्ञ पशुवैद्य तैनात असायला हवा." कदम मान्य करतात की जंगली हत्तींबाबत काय करायचं याविषयी अजूनही महाराष्ट्रात निश्चित रणनीती तयार झालेली नाही. "कर्नाटकला त्यांचा शेकडो वर्षांचा अनुभव आहे पण २००४ पूर्वी, महाराष्ट्रात असा काही संघर्ष उभा राहील अशी कुणाला कल्पनाही नव्हती."
हत्तींच्या प्रशिक्षणाबाबतहि आक्षेप घेतले जातात. प्रत्यक्षदर्शी म्हणतात की शिकवताना हत्तींना मारलं जातं, छळलं जातं. शिंदे म्हणतात की, "ही जुनाट पद्धती आहे. हत्तीसारख्या संवेदनशील प्राण्याला विश्वासात घेऊन शिकवायला हवं." तज्ञाचं मत आहे की या जुनाट पद्धतीमुळेच या दोन हत्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले असावेत. शिंदे म्हणतात, "जंगली हत्ती आपलं सारं आयुष्य मनस्वीपणे जगत असतात. अचानक त्याला एका छोट्याश्या जागेत बंदिस्त केलं जातं. याचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि त्यामुळे शारीरिक स्वास्थ्यावरही होतो. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक ऊर्मीनुसार जगू द्यायला हवं. एखाद्या सुनिश्चित केलेल्या अभयारण्यात जर त्यांना राहू दिलं तर ते गावांमध्ये शिरणार नाहीत. शेतकरीही निश्चिंत होतील आणि वनांचंही संवर्धन होईल."
लिमये म्हणतात की महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील दांडेली-तिल्लारी गज अभयारण्य हा या संघर्षावरचा कायमचाइलाज असू शकेल. "दोन्ही सरकारे एकत्रितपणे यावर काम करू शकतील." मात्र त्यासाठी, "शेतकऱ्यांना जागरूक करणे आणि शिक्षित करणे ही लगेचची उद्दिष्टं ठेवायला हवीत," असं त्यांना वाटतं. कारण भीतीपोटी केलेलं वर्तन पाहून हत्ती अधिकच चवताळून अंगावर येतात, त्यामुळे मृत्यूही संभवतात. नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक वेगवान व्हायला हवी असंही लिमयांचं म्हणणं आहे.
डॉ. एन.व्ही.के. अश्रफ, वाईल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे प्रमुख, शेतकऱ्यांना अगदी नाविन्यपूर्ण मार्ग सुचवतात. ते म्हणतात, "हत्तींना आकर्षण वाटतं अशी पिकं शेताच्या मध्याला घ्या आणि लिंबू, मिरच्या, मधमाशीपालन अशा गोष्टी ज्या हत्तींना नावडत्या आहेत त्या शेताच्या परीघावर लावा."
अर्थात अशा सूचना, कल्पना येताच राहणार. पण माणसांच्या अतिक्रमणामुळे वनजमीन कमी होते आहे हे सत्य आहे आणि त्यावर कोणताच उपाय नाही. दोन्ही पक्ष – माणूस आणि हत्ती –एकमेकांचं भय बाळगत, त्यामुळे आपला मोकळा वावर घालवत जगणार.
सूर्य आपला दिवसभराचा प्रवास करून मावळतीकडे पोचलाय्, न्हानोच्या बायकोने घराच्या खिडक्या आणि दार बंद केलीत. मुला – सुना, नातवंड सगळ्यांना घरात येण्याचा हुकुम ती सोडते. न्हानो मात्र आपली काठी आणि विजेरी घेऊन शेतातल्या मचाणाकडे रवाना होतोय. आज राखण करण्याची त्याची पाळी आहे.
अनुवादः छाया देव