"उन्हाळा हातचा चाललाय हो! [बहुतेक] माठ विकायचा खरा हाच मौसम, पण आम्हाला जास्त काहीच विकता आलं नाही," रेखा कुंभकार म्हणतात. त्या आपल्या घराबाहेरच्या आव्यात माठ भाजण्यापूर्वी त्यावर रंगाचा हात देतायत. टाळेबंदीच्या काळात त्या आपल्या घरीच माठ बनवत होत्या, क्वचित कधी घराबाहेर पडत होत्या.
एरवी मार्च ते मे दरम्यान बाजारात विकली जाणारी लाल मडकी कुम्हारपाडा या छत्तीसगढच्या धमतरी शहरातल्या कुंभारवाड्यात घरांबाहेर मांडून ठेवली आहेत. "जसं भाजीवाल्यांना सकाळी ७:०० ते १२:०० मध्ये भाज्या विकू देतात, तसं आम्हाला पण माठ विकू द्यायला पायजे, नाय तर आमची पंचाईत होईल," रेखा म्हणाल्या होत्या.
तेवढ्यातच भुबनेश्वरी कुंभकार आपल्या डोक्यावर रिकामी बांबूची दुरडी घेऊन कुम्हारपाड्यात परतल्या. त्या म्हणाल्या, "पहाटेपासनं शहरातल्या पुष्कळ वस्त्यांमध्ये माठ विकायला गेली होती. तिथं आठ विकले अन् परत येताना वाटेत आणखी आठ. पण लवकर परत यावं लागलं कारण दुपारच्याला लॉकडाऊन परत सुरू होईल. आम्हाला बाजारात जाऊ देत नाहीत म्हणून जास्त काही विकता येईना. सरकारनं दिलेले ५०० रुपये अन् तांदळावर अख्ख्या परिवाराचं कसं भागावं?"
कुम्हारपाड्यातली सगळी कुटुंबं इतर मागासवर्गीय कुम्हार समाजाची आहेत. ते ५०-७० रुपयाला एक माठ विकतात. मार्च ते मे हा खरा विक्रीचा हंगाम कारण तेव्हाच लोक पाणी साठवायला आणि थंड करायला माठ विकत घेतात. या काळात प्रत्येक कुटुंब २०० ते ७०० माठ बनवतं. घरातील किती जण कामात मदत करतात त्यावर माठांची संख्या अवलंबून असते. उरलेल्या मोसमांत कुंभार सणावारांना लहान मूर्ती, दिवाळीत पणत्या, लग्न समारंभासाठी सुगडी इत्यादी वस्तू तयार करतात.
त्यांचं काम पावसाळ्यात, जूनचा मध्य ते सप्टेंबरच्या अखेरीस, थांबतं कारण तेव्हा चिकणमाती वाळत नाही आणि घराबाहेर काम करणं शक्य नसतं. या काळात काही कुंभार रू. १५०-२०० रोजंदारीवर शेतमजुरी करतात (एकाही कुटुंबाच्या मालकीची जमीन नाही).




