चौकुळच्या शेतातली जागल
'पारी' स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरातल्या ३०० गावांत जायचंय आणि इतर गोष्टी टिपत असतानाच ही मालिकाही तयार करायची आहे: गावातील एखाद्या दृश्याचं किंवा प्रसंगाचं छायाचित्र आणि त्याच छायाचित्राचं एक रेखाचित्र. हे 'पारी'वरच्या या मालिकेतलं दुसरं पान. चित्रावरची पट्टी सरकवून तुम्ही पूर्ण छायाचित्र किंवा रेखाचित्र पाहू शकता.
एखादं
सुंदर चित्र असल्यासारखं दृश्य आहे, शेताच्या मधोमध एक मचाण. प्रत्यक्षात मात्र
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चौकुळ गावात शेतीच्या हंगामातलं हे एक
खडतर काम आहे. इथे, आणि देशातल्या इतरही अनेक भागात शेतकऱ्यांना अनेक रात्री अशा
मचाणावर जागलीला रहावं लागतं. कारणः रात्री पिकं खायला येणाऱ्या रानडुकरांपासून ते
हत्तीपर्यंत वेगवेगळ्या जंगली जनावरांना हाकलून लावायचं असतं.
सावंतवाडी
तालुक्यातलं चौकुळ हे १,३०० वस्तीचं गाव. इथेही जंगली जनावरांचा वावर आहेच. पिकाचं
रक्षण करणं सोपं नाही. घरातलं जे कुणी रात्री या मचाणावर जागलीला असतं त्याला
डोळ्यात तेल घालून रात्र जागून काढावी लागते. या भागात मचाणावरच्या माणसाला जंगली
जनावरांशी मुकाबला करताना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
अनुवादः मेधा काळे