“उन्हाने माझी पाठ भाजून निघालीये,” बजरंग गोस्वामी सांगतात. गजुवास गावाबाहेरच्या खजुरांच्या झाडांच्या सावलीच्या तुकड्यात गोस्वामी जमिनीवर बसले होते. “उष्मा वाढलाय, पीक कमी झालंय,” बाजरीच्या राशींवर नजर फिरवत ते सांगतात. जवळच वाळलेलं गवत खात एक उंट उभा आहे. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातल्या तारानगर तहसिलातल्या आपल्या २२ बिगा जमिनीवर गोस्वामी आणि त्यांची पत्नी राज कौर खंडाने शेती करतात.
“माथ्यावर सूर्याची तलखी आणि पायाला वाळूचा चटका,” तारानगरच्या दक्षिणेला असलेल्या सुजनगढ तहसिलातल्या गीता देवी नायक म्हणतात. गीता देवी विधवा आहेत आणि भूमीहीन आहेत. त्या भगवानी देवी चौधरींच्या शेतात मजुरी करतात. पाच वाजत आलेत, गुडवारी गावात या दोघांचं काम नुकतंच संपलंय. “गरमी ही गरमी पडे है आज कल,” भगवानी देवी म्हणतात.
राजस्थानच्या उत्तरेकडच्या चुरु जिल्ह्यात, उन्हाळ्यात वाळवंट तापतं आणि मे-जून महिन्यातलं वारं म्हणजे भट्टीत असल्यासारखं वाटतं. आणि मग उकाडा – तोही कसा जास्तच तीव्र होत चाललाय – याच्या गप्पा सगळीकडे सुरू होतात. या महिन्यांमध्ये तापमान ४० अंशाच्या अगदी सहज जात असतं. गेल्याच महिन्यात, मे २०२० मध्ये पारा ५० अंशावर गेला होता – आणि काही बातम्यांनुसार हे २६ मे रोजी इथलं तापमान जगात सगळ्यात जास्त होतं.
त्यामुळे गेल्या वर्षी, जूनच्या सुरुवातीला, चुरुमध्ये जेव्हा पारा ५१ अंशाच्या पुढे गेला – पाण्याच्या उत्कलन बिंदूच्या जवळ जवळ निम्मा – अनेकांसाठी ती फारशी काही महत्त्वाची घटना नव्हती. “मला आठवतंय, ३० वर्षांपूर्वी देखील पारा ५० अंशापुढे गेला होता,” ७५ वर्षांचे हरदयाल सिंग म्हणतात. जमीनदार असणारे आणि शाळेतून निवृत्त झालेले सिंग गजुवास गावातल्या आपल्या हवेलीत खाटेवर पहुडले होते.
आणि काही वर्षं अशी की सहाच महिन्यांनंतर, चुरुमध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं. आणि फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय वेधशाळेच्या निरीक्षणांनुसार भारतातील पठारी प्रदेशांमध्ये सर्वात कमी तापमान चुरु इथेच होतं, ४.१ अंश सेल्सियस.


















