संध्याकाळचे सहा वाजलेत. गायी परतण्याची वेळ झालीये. पण म्हसईवाडीत पुढचे किमान सहा महिने तरी गायी काही परतून यायच्या नाहीत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातली ३१५ उंबरा असणारी म्हसईवाडी एकदम सुनी सुनी झाली आहे. गायीच्या घुंगुरमाळांचा, घंटांचा आवाज नाही, हंबरणं नाही ना त्यांना हाकणाऱ्यांचे पुकारे. शेणाचा वास नाही, दूध गाड्यांची वर्दळ नाही. चारा आणि पाण्याअभावी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हसईवाडीची निम्मी माणसं आणि बहुतेक सगळी गाई-गुरं पाच किलोमीटरवरच्या म्हसवडपाशी असलेल्या चारा छावणीत मुक्कामाला गेली आहेत.
त्यातल्याच एक आहेत संगीता नंदू वीरकर, वय ४०. धनगर समाजाच्या संगीता १ जानेवारीपासून आपल्या दोन जर्सी गाया आणि दोन म्हशींसोबत वडलांची एक गाय आणि वासरू घेऊन छावणीत दाखल झाल्या आहेत. माहेरी भाऊ जगायला बाहेर पडलाय आणि म्हातारपणामुळे आई-वडलांना गुरं सांभाळणं होत नाही. मुलांचं शिक्षण चालू रहावं म्हणून संगीताचे पती नंदू वीरकर, वय ४४ गावी राहिलेत. त्यांची सर्वात थोरली मुलगी लग्न होऊन नांदायला गेलीये, दोन नंबरची कोमल, वय १५ दहावीत शिकतीये आणि धाकटा विशाल सातवीत आहे. घरी कुत्रं, मांजर आणि तीन शेरडंही आहेतच.
“लेकरांची शाळा सुरू हाय, पोरगी दहावीला बसलीये. तिथं पोरं आन् इथे जितराब. दोघांचं बी बघावं लागणार,” संगीता म्हणतात. “यंदा एक पण मोठा पाऊस नाही. सासरी १२ एकर रान आहे, तिघा भावात. आमच्या वाट्याची २०-२५ पोते जवारी-बाजरी होते खायापुरती. पण यंदा काहीच नाही. जवाऱ्या गेल्या, बाजरी गेली त्यामुळे कडबं नाही. पाऊसच नाही म्हटल्यावर चारा तर कुठून मिळणार. रब्बीचा पेराही झाला नाही. गुरं कशी जगवावी सांगा.” प्रेमाने आपल्या गायांच्या अंगावरून हात फिरवत संगीता विचारतात.









