शाहिदानी डॉ. सरकारांची भेट घेतली आणि तिचं काम झाल्यानंतर मी आणि ती बाजारातून तिच्या घराकडे निघालो. दिवसा या बाजारात चिटपाखरूही नसतं, चहाच्या काही टपऱ्या आणि औषधाची थोडी दुकानं काय ती सुर असतात. बहुतेक दुकानं संध्याकाळी उघडतात. दिवसभर धुबरीत रिक्षा ओढायचं, काहीबाही विकायचं आणि बांबूचं काम आटपून लोक आपापली दुकानं उघडतात. शाहिदाचा नवरा शाहजमाल शेख, धुबरी शहरात रिक्षा ओढतो आणि त्याचं चारवरच्या बाजारात छोटं किराणामालाचं दुकान आहे.
बिरसिंगमधल्या अनेक घरांवर सौर पॅनल लावलेले आहेत. काहींना सरकारी योजनेत ३,६०० रुपयांना एक सोलर पॅनल आणि बॅटरीचा संच अनुदानित किंमतीवर मिळाला आहे. यावर १.५ वॉटचे दोन सीएफएल किंवा एलईडी दिवे लागू शकतात. काहींनी बाजारात २०,००० रुपयांना मिळणारा सौर ऊर्जा संचही घेतला आहे. त्याच्यावर एका वेळी चार बल्ब आणि टीव्ही किंवा एक पंखा चालू शकतात. “धुबरीत थोडी फार कामं करून कमाई होते त्यातून आम्ही अशा सौर पॅनलसारख्या गरजा भागवू शकतो,” बाजारात छोटी खानावळ चालवणारे ताराचांद अली सांगतात.
पंचायत सदस्य असणारे अस्मत अली, वय ६२ यांच्या अंदाजानुसार बिरसिंगमधल्या किमान निम्म्या घरांवर तरी सौर पॅनल लागलेले आहेत. “आता रात्रीदेखील मुलं निवांत अभ्यास करू शकतात,” ते म्हणतात. “पूर्वी फक्त रॉकेलवर दिवे लागायचे, त्यामुळे त्यांना फारसा अभ्यास करता यायचा नाही.”
चार वर्षांपूर्वी, आसाम ऊर्जा विकास मंडळाने (आऊविमं) बिरसिंगच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीवर देखील ४ किलोवॉटची सौरयंत्रणा बसवली आहे. अपारंपिरक व अक्षय ऊर्जा खात्यासाठी राज्यस्तरीय संस्था म्हणून आऊविमं काम करतं. मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार नवीन सौर पॅनल किमान २५ वर्षं टिकतं अर्थात मोडतोड केली नाही तर. बॅटऱ्यांची देखभाल करावी लागते आणि गरज पडेल तेव्हा धुबरीहून देखभाल दुरुस्तीसाठी माणसं बोलावता येतात.