२० डिसेंबर. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया म्हणजेच पारीचा आज सातवा वाढदिवस. मागच्या वर्षीच्या महासाथीचा आणि टाळेबंदीचा आम्ही मुकाबला तर केलाच, पण आमचं आतापर्यंतचं सर्वोत्तम काम आम्ही याच काळात केल्याचं तुम्हाला दिसेल.
टाळेबंदीच्या अगदी पहिल्या दिवशी भारत सरकारने असं जाहीर केलं की माध्यमं, छापील आणि इलेक्ट्रॉनिक हे अत्यावश्यक सेवांमध्ये गणजे जाणार आहेत. हे चांगलंच होतं. कारण आजवर या देशातल्या लोकांना पत्रकारिता आणि पत्रकारांची इतकी गरज काही कधी भासलेली नव्हती. लोकांचं आयुष्य आणि त्यांच्या उपजीविका ज्यावर अवलंबून होत्या अशा सगळ्या गोष्टी सांगणं फार गरजेचं होतं. पण या देशातल्या बड्या माध्यम समूहांनी मात्र काय केलं? किमान दोन ते अडीच हजार पत्रकार आणि पत्रकारिता न करणाऱ्या पण माध्यमांमध्ये काम करणाऱ्या दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना या समूहांनी कामावरून चक्क काढून टाकलं.
इतक्या सगळ्या घटना आणि गोष्टी ते कसे सांगणार होते? आपल्याकडच्या काही सर्वोत्तम वार्ताहरांना कामावरून काढून टाकून? माध्यमांमध्ये काम करणाऱ्या इतर हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान ४०-६० टक्क्यांची कपात करण्यात आली. पत्रकारांच्या प्रवासावर काटेकोर निर्बंध लादले गेले. आणि तेही त्यांच्या तब्येतीची काळजी होती म्हणून नाही तर काटकसर म्हणून. त्यामुळे मग ज्या गोष्टी आपल्याला वाचायला-पहायला मिळाल्या, खास करून २५ मार्च २०२० नंतरच्या पंधरवड्यानंतर, त्या जास्त करून शहरांमध्ये किंवा मोठ्या नगरांमध्ये घडणाऱ्या होत्या.
एप्रिल २०२० नंतर पारीमध्ये काम करणाऱ्या गटात ११ जणांची भर पडली, एकालाही कामावरून कमी केलं गेलं नाही आणि एका पैशाची कपात आम्ही केली नाही. उलट, २०२० च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही आमच्यासोबत काम करणाऱ्या बहुतेकांना पदभरती दिली तसंच त्यांच्या मानधनात वाढ केली.
आमचं नियमित वार्तांकन नेहमीप्रमाणे अतिशय उत्तमरित्या सुरू होतंच पण महासाथीला सुरुवात झाली तेव्हापासून पारीवर कहाण्या, लेख, महत्वपूर्ण अहवाल आणि कागदपत्रांसह २७० वृत्तांत प्रकाशित झाले (बहुतेकांमध्ये बहुमाध्यमांचा वापर करण्यात आला होता.) आणि या सगळ्यांचा गाभा एकच होता – टाळेबंदीच्या काळातलं जिणं आणि जगणं. देशातल्या बहुतेक सर्व प्रदेशांमधून, २३ राज्यांतून हे वृत्तांत आले. स्थलांतरित कामगार ज्या गावांना परतत होते तिथूनही या कहाण्या आम्ही सादर केल्या. मिळेल त्या वाहनांनी हजारो किलोमीटर प्रवास करून आमचे वार्ताहर आणि पत्रकार देशाच्या कानाकोपऱ्यात पोचत होते. एकूण ६५ जणांनी या काळात पारीवर वार्तांकन केलं. महासाथीच्या आधीही आम्ही स्थलांतरित कामगारांविषयी बोलत-लिहीत होतोच. इतर माध्यमांसारखं आम्हाला या समूहाचा शोध २५ मार्च २०२० रोजी लागलेला नाही.
आमच्या वाचकांना माहिती आहे की पारी पत्रकारितेचा मंच आहेच पण एक जिताजागता संग्रह देखील आहे. ग्रामीण भारताबद्दलचे लेख, अहवाल, गाणी, लोकसंगीत, छायाचित्रं आणि चित्रफिती पारीवर आहेत तितक्या संख्येत तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. आणि फक्त या देशात नाही अख्ख्या जगात केवळ गावपाड्यांबद्दल इतकं सारं पारीशिवाय तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. पारीची पत्रकारिता रोजच्या माणसांच्या रोजच्या जगण्यासंबंधी आहे. या देशातल्या ८३.३ कोटी लोकांच्या स्वतःच्या आवाजात आणि स्वतःच्या अनुभवांमधून तुम्ही त्यांच्या आयुष्यांबद्दल इथे जाणून घेऊ शकता.










