"३५० रुपयांना लावतो. आता आणखी भाव करू नका, आधीच कोरोनापायी काही कमाई होईना गेलीये," प्रकाश कोकरे एका गिऱ्हाइकाशी सौदा करत होते. त्यांनी एक ढवळं कोकरू उचललं आणि जमिनीवरच्या वजन काट्यावर ठेवलं. "तीन किलो," त्यांनी रू. २०० प्रति किलोवर अडून बसलेल्या दोन ग्राहकांना सांगितलं. "लई कमी सांगताय, पर मलाच पैशाची नड हाय," ते कोकरू त्याच्या नव्या मालकांकडे सुपूर्द करुन प्रकाश म्हणाले.
"जाऊ द्या, काय करणार?" ते मला म्हणाले. वाडा तालुक्यातील देसाईपाड्यात जूनच्या अखेरच्या आठवड्यात दुपारी एका माळावर माझी त्यांची भेट झाली. कोविड-१९ टाळेबंदी लागून तीन महिने उलटले होते.
प्रकाश यांच्यासह आणखी सहा कुटुंबं दोन दिवस महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील त्या माळावर मुक्कामाला होती. सगळे भटक्या पशुपालक धनगर समाजातले. काही बाया पिलं इथंतिथं जाऊ नयेत म्हणून नायलॉनचं कुंपण घालत होत्या. धान्याने भरलेली पोती, ॲल्युमिनयमची भांडी, प्लास्टिकच्या बादल्या आणि इतर वस्तू माळावर विखुरल्या होत्या. काही मुलं कोकरांसोबत खेळत होती.
कोकरं, बकरे व मेंढ्या विकणं – जसं प्रकाश यांनी नुकतंच भाव करून विकलं – हे या धनगर समूहांसाठी उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. या सात कुटुंबांकडे २० घोडी धरून सुमारे ५०० जितराब आहे. ते मेंढ्या पाळतात आणि पैशाच्या किंवा धान्याच्या बदल्यात त्या विकतात. शेळ्या सहसा आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी लागणारं दूध काढायला ठेवल्या जातात आणि एखाद्या वेळी बकरे मटण विक्रेत्यांना विकल्या जातात. कधीकधी त्यांचं जितराब कुरणांवर चरतं आणि त्यांच्या लेंड्यांच्या बदल्यात जमिनीचे मालक या कुटुंबांची काही दिवस खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय करतात.
"आम्ही फकस्त मेंढा विकतो अन् मेंढी ठेऊन घेतो," या मेंढपाळांचे म्होरके ५५ वर्षीय प्रकाश म्हणाले. "शेतकरी आमच्याकडून मेंढरं विकत घेतात कारण शेतावर चरायला ती कामी येतात. त्यांच्या लेंड्यांमुळं जमीन सुपीक होते."
महाराष्ट्रात भटक्या जमातीत मोडणाऱ्या धनगर समाजातली ही सात कुटुंबं खरीप हंगामानंतर नोव्हेंबर दरम्यान आपला भटकंती सुरू करतात. (भारतात महाराष्ट्राव्यतिरिक्त मुख्यतः बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मिळून अंदाजे ३६ लाख धनगर आहेत.)
चारणीला निघालं की ही सात कुटुंबं – अंदाजे ४० जण – कधीकधी प्रत्येक गावात महिनाभर मुक्काम करतात, आणि दर २-३ दिवसांनी एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊन निवाऱ्यासाठी टारपोलिनचं छत उभारतात. गावांहून दूर असले की ते सहसा जंगली भागांमध्ये राहतात.
प्रकाश आणि त्यांच्यासोबत असलेले इतर जण मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या ढवळपुरी गावचे आहेत. पण त्यांची दरवर्षीची भटकंती मात्र जूनपर्यंत नाशिकला येऊन संपते. तिथे ते वेगवेगळ्या गावांमध्ये पडक जमिनींवर तात्पुरता निवारा बांधून पावसाळा काढतात.
मात्र २५ मार्च रोजी सुरू झालेल्या कोविड-१९ टाळेबंदीमुळे कोकरे समूहाला त्यांच्या नेहमीच्या मार्गाने प्रवास करणं अवघड झालं. "आम्ही रोज जवळपास ३० किमी चालायचो, पण या लॉकडाऊनमुळं लोक आम्हाला त्यांच्या जागेत राहू देत नव्हते," प्रकाश म्हणाले.
वाडा तालुक्यात येण्यापूर्वी हे कुटुंब ४० दिवस टाळेबंदी शिथिल होण्याची वाट पाहत तिथून अंदाजे ५५ किमी लांब असलेल्या पालघरमधील वाणगाव येथील एका शेतात थांबले होते. जूनपासून हिंडणं जरा सोपं झालं तेव्हा त्यांनी पुन्हा वाटचाल सुरू केली. "आमच्या जितराबामुळे आम्हाला निघणं भाग होतं, म्हणून पोलिसांनी आम्हाला आडकाठी केली नाही," प्रकाश म्हणाले. "लोकांनाही आम्ही त्यांचं गाव सोडून जावं असंच वाटत होतं."
त्यांना एप्रिलमधील एक प्रसंग आठवतो जेंव्हा वाणगावचे काही रहिवाशी त्यांच्या कुटुंबावर ओरडले होते. "ते म्हणले की आम्ही त्यांच्या जमिनीवर येऊन त्यांचा जीव धोक्यात घातलाय. पण आम्ही कायम असंच जगत आलोय. माझा बा अन् त्याच्या बा, आम्ही समदेच, आमचं जितराब घेऊन भटकायचो. आम्ही एका ठिकाणी कधी राहिलोच नाही. घरी राहायला आम्हाला घरच नाही की.”
मात्र, टाळेबंदीमुळे त्यांना स्वतःचं घर असावं असं वाटून गेलं. "आमचे हाल झालेत," प्रकाश म्हणाले. "एक घर असतं तर बरं झालं असतं..."
टाळेबंदी दरम्यान वाहतुकीचे पर्याय तर जवळजवळ नव्हतेच, शिवाय धनगर कुटुंबांना इतरही संकटांचा सामना करावा लागला. हे पशुपालक कायम प्रवासात किंवा बरेचदा दुर्गम भागात राहत असल्याने एरव्हीही त्यांना वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध नसतात. जूनच्या मध्यात, प्रकाश म्हणाले, "माझी पुतणी अन् तिचं पोर वारलं. ती पोटुशी होती."
सुमन कोकरे जवळच्या एका नळावर पाणी भरायला गेली होती तेव्हा तिला साप चावला. टोळीतील काही जणांना ती सापडली. ऑटोरिक्षा मिळाला नाही तेव्हा त्यांनी एक खासगी रुग्णवाहिका मागवली. पालघरमधील रुग्णालयांत कोविड-१९ रुग्णांचा बोजा वाढल्याने त्यांनी तिला भरती करण्यास नकार दिला. "कितीतरी तास आम्ही तिला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात नेत राहिलो, पण कोणी भरतीच करंना. रात्री आम्ही उल्हासनगरला [अंदाजे १०० किमी लांब] जायला निघालो, पण वाटंतच ती मरण पावली. तिथल्या दवाखान्यानं आम्हाला दोन दिवसांनी तिचं प्रेत दिलं," प्रकाश म्हणाले.
"लेकरं [वय ३ व ४ वर्षे] मला विचारतात आई कुठं गेली," सुमन यांचे पती, ३० वर्षीय संतोष विचारतात. "मी त्यांना काय सांगू? माझं [न जन्मलेलं] बाळ अन् बायको वारलेत. हे त्यांना कसं सांगू?"
महामारी दरम्यान घ्यावयाच्या खबरदारीची या मेंढपाळांना जाणीव आहे, पण जंगली भागांमध्ये मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना बातम्या आणि इतर माहिती नियमितपणे मिळत नाही. "आम्ही रेडिओ ऐकतो," जाई कोकरे म्हणाली. "त्यांनी हात धुवायला अन् मास्क लावायला सांगितलं. आम्ही गावात गेलो की आमचं तोंड पदरानं झाकतो."
त्या दिवशी पालघरमध्ये मुक्कामाला असताना २३ वर्षीय जाई, प्रकाश यांची भाची, तात्पुरत्या दगडी चुलीवर ज्वारीच्या भाकरी करत होती. तिचा एक वर्षाचा मुलगा दानेश बाजूलाच खेळत होता. "आम्ही एक वेळ जेऊन राहू शकतो, पण निदान आमच्या जनावरांचा तरी इचार करा," वाणगावमध्ये धनगरांना निघायला सांगितलं तो प्रसंग आठवून ती म्हणाली. "आमच्या मेंढ्या राहू शकतील अशी एखादी जागा द्या, आम्ही तिथंच सुखानं राहू. आम्ही आमचं बघून घेऊ, पण आमच्या मेंढ्यांना चारापाणी हवं."
टाळेबंदीपूर्वी ही सात कुटुंबं मिळून आठवड्याला ५-६ मेंढ्या विकायचे – कधी कधी तर आठवड्याला एकच जनावर विकलं जायचं – आणि, प्रकाश म्हणतात की, कधी कधी सधन शेतकरी त्यांच्याकडून जनावरांची ठोक खरेदी करायचे. ते सहसा महिन्याला साधारण १५ बकरी विकायचे, आणि त्यात सगळ्यांचा खर्च भागवायचे. "आमचं समद्यांचं एकच घर आहे, आम्ही एकाच छताखाली राहतो," प्रकाश म्हणाले.
टाळेबंदी दरम्यान ही विक्री मंदावली – नेमकी किती ते प्रकाश यांना ठाऊक नाही, पण ते म्हणतात की त्यांनी आपल्या बचतीतून निभावून नेलं – शिवाय रू. ५० प्रति किलोला मिळणारा तांदूळ रू. ९० प्रति किलो आणि रू. ३० प्रति किलोला मिळणारा गहू रू. ६० प्रति किलोला विकल्या जाऊ लागला. "इकडली [वाड्यातील] समदी दुकानं आम्हाला लुटतायंत," जाई म्हणाली. "ते आम्हाला जास्त भावात धान्य विकतात. आता पुढल्या मुक्कामापर्यंत राशन वाचवून ठेवावं लागंल. आजकाल तर आम्ही एक वेळच जेवतो."
ही कुटुंबं सांगतात की त्यांना शासनाकडूनही थोडं राशन मिळालंय. "सात घरं मिळून [अहमदनगर प्रशासनाकडून] फकस्त २० किलो तांदूळच मिळालाय," प्रकाश म्हणाले. "मला सांगा, एवढ्या लोकांना २० किलो कसा पुरावा? आमच्या गावात [ढवळपुरी, जिथे ते कधीकधी भेट देतात] आम्ही [रेशनवर] कमी पैशात माल विकत घ्यायचो, पण बाहेरगावी पूर्ण पैसे द्यावे लागतात…"
"कधी कधी जंगलात राहताना तेल लवकर संपतं किंवा तांदूळ १५ दिवसांतच संपतो. मग आम्हाला आसपासच्या गावात परत जाऊन किराणा विकत आणावा लागतो," प्रकाश म्हणाले.
"अन् या आजारामुळं [कोविड-१९] माझी पोरं पण माझ्यासंगंच फिरतायंत. त्यांनी खरं तर शाळंत शिकायला हवं," प्रकाश यांच्या बहीण जागन कोकरे, वय ३०, म्हणाल्या. सहसा फक्त लहान मुलंच त्यांच्या आईवडलांसोबत फिरत असतात, मात्र ६ ते ८ वर्षांहून मोठी मुलं ढवळपुरीतील आश्रमशाळेत थांबतात. फक्त उन्हाळ्यात शाळा बंद असल्या की मोठी मुलंसुद्धा त्यांच्यासोबत प्रवास करतात. "माझा मुलगा आता मेंढ्यांमागे जातोय," जगन म्हणाल्या. "मी तरी काय करणार? कोरोनापायी आश्रमशाळा बंद केल्या, मग त्याला आमच्यासंगं घेऊन यावं लागलं."
जागनची दोन मुलं, सनी आणि परसाद, ढवळपुरीत अनुक्रमे इयत्ता ९ आणि ७ वीत शिकतात; त्यांची सहा वर्षांची मुलगी तृप्ती अजून शाळेत गेली नाहीये आणि ती आपल्या आईला त्यांचं सामान घोड्यांवर लादण्यात मदत करते. "डोक्यावर धड छत नाही म्हणून आमच्या पोरांनी आमच्यापरी इकडून तिकडं भटकायला नको," जागन म्हणाल्या. "असं हिंडणं सोपं नाही, पण आम्ही आमच्या जितराबासाठी करतो."
मी त्यांना जून अखेरीस भेटले तेंव्हा ही सात कुटुंबं पालघरहून निघायच्या तयारीत होती. "आमच्या मेंढ्यांना या भागातला पाऊस झेपायचा नाय अन् त्या आजारी पडतील," प्रकाश म्हणाले होते. "म्हणून आम्हाला नाशिकला परत जावं लागंल, तिथं पाऊस कमी आहे."
इतक्यात जेव्हा फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं, तेव्हा ते नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्याच्या आसपास होते, त्यांच्या ओळखीच्या मार्गांवर, पिढ्या न् पिढ्या परिचित असलेल्या तालात त्यांचा प्रवास सुरू होता.
अनुवादः कौशल काळू