“मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही,” नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या अहिवंतवाडीच्या ५० वर्षीय कुंदाबाई गांगुडे सांगतात. दुपारचे १.३० वाजायला आले होते. “माझ्या गावची माणसं आली की मगच मी जेवेन.”
कुंदाबाई इतर काही स्त्रिया आणि पुरुषांसोबत मिळून ५० शेतकऱ्यांसाठी भात शिजवत होत्या. हे सगळे मागील आठवड्यात झालेल्या लाँग मार्च मधल्या मोर्चेकऱ्यांसाठी जेवण बनवायला त्यांच्या तालुका तुकड्यांआधी पुढे आले होते. जवळच, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सोनजांब गावातून आलेल्या गंगुबाई भवर (शीर्षक छायाचित्रात दिसून येणाऱ्या) वांगे - बटाटे शिजवत होत्या. "आमच्या तालुक्यातले शेतकरी सोबत धान्य, पीठ-मीठ अन् भाज्या घेऊन आलेत," त्या म्हणाल्या.
२१ फेब्रुवारी रोजी नाशिकहून ११ किमी पायी चालत गेल्यावर दुपारी २:३०च्या सुमारास नाशिक तालुक्यातील विल्होळी गावाहून एखाद किमी दूर शेतकऱ्यांनी जेवायला थांबा घेतला. ते आपल्या गावांतून २० फेब्रुवारीला नाशिकला येऊन पोहोचले होते. (शासनाच्या प्रतिनिधींसोबत दीर्घकाळ चर्चा केल्यावर आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील अशी शासनाकडून लेखी हमी आल्यावर मार्च आयोजित करणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेने २१ फेब्रुवारीला उशिरा रात्री आंदोलन मागे घेतलं.)
२०१८ मध्ये नाशिक ते मुंबई झालेल्या लॉंग मार्च दरम्यानसुद्धा महादेव कोळी या अनुसूचित जमातीच्या कुंदाबाईंनी आपल्या गावातील मंडळींसाठी जेवण बनवलं होतं.










