२००७ साली पोलामारासेट्टी पद्मजा हिला लग्नात घरून हुंड्यात २५ तुळम् (२५० ग्रॅम) सोनं मिळालं होतं. "माझ्या नवऱ्यानं ते सगळं मोडलं आणि खर्चून टाकलं. तेव्हा त्याला मी पण नकोशी झाले होते," ३१ वर्षीय पद्मजा म्हणते. पोटापाण्यासाठी ती आता घड्याळं दुरुस्त करते.
पद्मजा यांच्या नवऱ्याने थोडं थोडं करून सगळे दागिने मोडले, आणि दारूवर उडवले. "मला स्वतःचं अन् माझ्या घरच्यांचं, खासकरून माझ्या मुलांचं पोट भरावं लागलं," ती सांगते. २०१८ मध्ये तिचा नवरा घरदार सोडून गेला तेव्हापासून ती घड्याळं दुरुस्त करतेय – आणि आंध्र प्रदेशातील विशाखपट्टणम शहरात हे काम करणारी ती कदाचित एकमेव महिला असावी.
तेव्हापासून ती एका छोट्या घड्याळाच्या दुकानात दरमहा रू. ६,००० पगारावर काम करते. पण मार्चमध्ये कोविड-१९ टाळेबंदी सुरू झाली, तेव्हा तिच्या कमाईला फटका बसला. तिला त्या महिन्यात अर्धाच पगार मिळाला, आणि एप्रिल व मे महिन्यात तर काहीच नाही.
"मागे टाकलेल्या पैशातून कसंबसं मेपर्यंत भाडं भरलं," पद्मजा म्हणते. ती आपली मुलं अमन, वय १३ आणि राजेश, वय १० यांच्यासह शहराच्या कंचरपालेम वस्तीत राहते. "माझ्या मुलांना शाळेत पाठवता येईल अशी आशा आहे. त्यांनी माझ्यापेक्षा [इयत्ता १०वी] जास्त शिकावं, असं वाटतं."
पद्मजाच्या पगारावर पूर्ण घर अवलंबून आहे, तिचे आईवडीलही. तिचा बेरोजगार नवरा काडीचीही आर्थिक मदत करत नाही. "तो अजूनही येत राहतो, पण पैशाची चणचण असेल तेव्हाच," पद्मजा म्हणते. तो आला की ती त्याला राहू देते.
"घड्याळ दुरूस्त करणं शिकायचं अचानकच ठरलं," तिला आठवतं. "माझा नवरा निघून गेला, तेव्हा मी सुन्न झाले होते. मी खूप कचखाऊ होते अन् मैत्रिणी म्हणाल तरी अगदी मोजक्याच. मला काय करावं ते कळेना, तेव्हा एका मित्रानं मला हे सुचवलं." तिच्या मैत्रिणीचे भाऊ, एम. डी. मुस्तफा, यांनी पद्मजाला घड्याळं कशी दुरुस्त करायची ते शिकवलं. त्यांचं विशाखपट्टणमच्या वर्दळीच्या जगदंबा जंक्शन भागात घड्याळाचं दुकान आहे, याच भागातल्या एका दुकानात पद्मजा काम करते. सहा महिन्यांत तिने हे कौशल्य आत्मसात केलं.
टाळेबंदी होण्यापूर्वी पद्मजा दिवसाला डझनभर घड्याळं दुरुस्त करायची. "मला कधी वाटलंच नाही की मी वॉच मेकॅनिक बनेल, पण आता मजा वाटते," ती म्हणते. टाळेबंदी झाल्यामुळे दुरुस्त करायला तितकी घड्याळं नव्हती. "मला ती टिक टिक, बंद घड्याळ ठीक करताना होणारे ते आवाज आठवत राहायचे," ती एका ग्राहकाच्या घड्याळाचं तुटलेलं 'क्रिस्टल' (काच - पारदर्शक आवरण) बदलत म्हणते.
काहीच आवक नसताना घर चालवणं जिकिरीचं काम होतं. पद्मजा जून महिन्यात कामावर पुन्हा रुजू झाली, तरी तिला दरमहा निम्माच पगार म्हणजे केवळ रू. ३,००० मिळतायत. जुलैमध्ये दोन आठवडे जगदंबा जंक्शन हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे त्या भागातील सगळी दुकानं बंद होती. धंद्यात अजून तेजी आली नाही, ती म्हणते. "मी दररोज सकाळी १०:०० ते रात्री ७:०० वाजेपर्यंत काम करते. मला दुसरं काम करणं जमणार नाही."
ती ज्या दुकानात काम करते त्याच्या समोरच फूटपाथवर मुस्तफा यांचं दुकान आहे. लहान आणि तरुणांसाठी काही घड्याळं, डिजिटल आणि काट्याची, एका निळ्या रंगाच्या स्टॉलमधील कप्प्यात मांडली आहेत. त्या कप्प्याच्या खाली त्यांनी सुटे भाग आणि चिमटे व ते वापरतात ते भिंग, यांसारखी हत्यारं ठेवले आहेत.
जूनमध्ये आपलं दुकान पुन्हा उघडल्यावर मुस्तफा यांची आवक दिवसाला रू. ७००-१००० वरून रू. ५० वर घसरली. मग कंटेनमेंटमुळे जुलैमध्ये दुकान पुन्हा बंद करावं लागलं तेव्हापासून त्यांनी ते तसंच राहू दिलं. "धंदा सुरू नव्हता आणि माझा प्रवासाचा खर्च माझ्या कमाईपेक्षा जास्त होता," ते म्हणतात. आणि त्यांना दर सहा महिन्यांनी माल भरायला रू. ४०,०००-५०,००० लागतात. म्हणून ते जुलैपासून आपल्या बचतीवरच गुजराण करतायत.
मुस्तफा गेलं अर्धं शतक घड्याळं नीट करतायत. "मी हे कसब माझ्या आजोबांकडून अन् वडलांकडून शिकलो, मी १० अगदी वर्षांचा होतो तेव्हापासून," बी. कॉम.ची पदवी घेतलेले ५९ वर्षीय मुस्तफा सांगतात. ते दोघेही हॉरोलॉजिस्ट (घड्याळ बनवणारे व दुरूस्त करणारे) होते आणि कंचरपालेममध्ये स्वतःची दुकानं चालवायचे. मुस्तफा यांनी आपलं दुकान १९९२ मध्ये सुरू केलं होतं.
"आमच्या धंद्याला पूर्वी मान होता. आम्हाला लोक वॉचमेकर म्हणून ओळखायचे. मोबाईल फोन आले तेव्हापासून घड्याळाचं मोल कमी झालं, अन् आमचंही," ते म्हणतात. २००३ पर्यंत ते विशाखा वॉचमेकर्स असोशिएशनचे सदस्यही होते. "ती एक युनियनच होती म्हणा, जवळपास ६० वॉच मेकॅनिक असतील. आम्ही दर महिन्याला भेटायचो. तो चांगला जमाना होता," त्यांना आठवतं. २००३ मध्ये ही संघटना फुटली आणि त्यांच्या पुष्कळ सहकाऱ्यांनी एक तर हा व्यवसाय सोडला किंवा हे शहर. पण मुस्तफा अजूनही आपल्या पाकिटात त्यांचं सदस्य असल्याचं कार्ड घेऊन फिरतात. "मला त्यातून एक ओळख मिळते," ते म्हणतात.
मुस्तफा यांच्या दुकानापासून थोड्याच अंतरावर असलेले मोहम्मद ताजुद्दीन हेदेखील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करतात: "नवनव्या टेक्नॉलॉजीमुळे हे काम आता विरत चाललंय. एक दिवस असाही येईल की घड्याळ दुरुस्त करणारा कोणीच उरणार नाही." पन्नाशीला टेकलेले ताजुद्दीन गेली २० वर्षं घड्याळं दुरुस्त करतायत.
मूळ आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरू शहराचे ताजुद्दीन आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन चार वर्षांपूर्वी विशाखपट्टणमला आले. "आमच्या मुलाला इथल्या एका टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग शिकायला पूर्ण स्कॉलरशिप मिळाली आहे," ते सांगतात.
"टाळेबंदीने मला वेगवेगळी घड्याळं शिकून घेण्याचा अवसर दिला, पण माझी कमाई हिरावून घेतली," ते पुढे म्हणतात. त्यांना मार्च ते मे दरम्यान त्यांना निम्माच पगार मिळाला. रू. १२,००० च्या निम्माय पुढचे दोन महिने बिनपगारी गेले.
ताजुद्दीन दिवसाला २० घड्याळं दुरुस्त करायचे, पण टाळेबंदीत मात्र त्यांच्याकडे एखादंच घड्याळ असायचं. त्यांनी घरबसल्या काही घड्याळं दुरुस्त केली. "मी बहुतेक करून बॅटरी दुरुस्त करणं, काच ['क्रिस्टल'] बदलणं किंवा हलक्या, अनब्रँडेड घड्याळांना पट्टा लावणं अशी कामं करत होतो," ते म्हणतात. ऑगस्टमध्ये मात्र त्यांना पूर्ण पगार मिळाला.
घड्याळ दुरूस्त करणं हा कोण्या एका समुदायाचा पारंपारिक व्यवसाय नाही, आणि त्याला कोणाकडूनही पाठबळ मिळत नाही, ताजुद्दीन म्हणतात. घड्याळ दुरूस्त करणाऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, असंही त्यांना वाटतं.
"खासकरुन अशा काळात पैशाची थोडी मदत झाली असती, तर बरं झालं असतं," एस. के. एलियासीन मान्य करतात. ते जगदंबा जंक्शनमधील एका प्रसिद्ध दुकानात घड्याळ दुरुस्तीच्या कामाला आहेत. त्यांनाही एप्रिल ते जून दरम्यान त्यांचा रू. १५,००० चा पगार मिळाला नाही, आणि मार्च, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अर्धीच रक्कम मिळाली. "माझ्या नातवाच्या शाळेतून आम्हाला फी भरा अन् नवीन पुस्तकं विकत घ्या म्हणून सारखे फोन यायचे," १० व ९ वर्षांच्या मुलांचे हे ४० वर्षीय वडील म्हणतात. "आमचं घर माझ्या बायकोच्या कमाईवर चालतंय." त्यांच्या पत्नी आबीदा एका प्राथमिक शाळेत शिक्षिका असून महिन्याला रू. ७,००० कमावतात, आणि त्यांनी आपल्या आईवडलांकडून फी आणि पुस्तकांच्या खर्चासाठी रू. १८,००० उधार घेतले.
एलियासीन २५ वर्षांचे असल्यापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. "घड्याळ दुरूस्त करणं हा माझ्या बायकोचा कौटुंबिक व्यवसाय होता. मला तो इतका आवडला की लग्न झाल्यावर मी माझ्या सासऱ्याकडून सगळं शिकून घेतलं," ते म्हणतात. "या कारागिरीतून मला जगण्याची उमेद अन् साधन मिळालं," एलियासीन म्हणतात. ते विशाखपट्टणम मध्येच मोठे झाले. ते कधी शाळेत गेले नाहीत.
ते ज्या घड्याळांवर काम करतात ती त्यांना विकत घेणं परवडत नसलं तरी त्यांना हाताळण्यातच एलियासीन समाधानी आहेत. बड्या घड्याळ कंपन्या सहसा दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतात, ते म्हणतात, आणि कोणालाही या कामासाठी नेमत नाहीत. बरेचदा त्यातला बिघाड दुरुस्त करण्याऐवजी 'मूव्हमेंट' (घड्याळाची अंतर्गत कार्यप्रणाली) नव्याने बदलून टाकण्यात येते. "आम्हा वॉच मेकॅनिक लोकांना मूव्हमेंट दुरुस्त करता येते," ते म्हणतात. "जगातल्या बड्या घड्याळ कंपन्या विनाकारण जे बदलून टाकतात, ते आम्ही दुरुस्त करू शकतो. मला माझ्या कामाचा अभिमान वाटतो."
ते स्वतः आपल्या कारागिरीत निष्णात असले तरी एलियासीन, मुस्तफा आणि जगदंबा जंक्शनमध्येच काम करणारे इतर वॉच मेकॅनिक ६८ वर्षीय मोहम्मद हबीबुर रेहमान यांचा आदर करतात. त्यांच्या मते ते कुठल्याही प्रकारचं घड्याळ दुरुस्त करू शकतात, अगदी लंबक घड्याळासारखं विंटेज घड्याळसुद्धा. जुन्या बनावटीच्या घड्याळांचं किचकट तंत्रही ते लीलया हाताळतात, आणि डायव्हिंग व क्वॉर्ट्झ घड्याळ दुरुस्त करण्यात त्यांची हातोटी आहे. "लंबक घड्याळाचा खरोखर शौक करणारे आता थोडेच उरलेत," हबीबुर म्हणतात (वरील कव्हर फोटोमध्ये). "आजकाल डिजीटलचा जमाना आहे."
हबीबुर ज्या दुकानात काम करतात त्याच्या मालकाने त्यांना कोरोनाव्हायरसमुळे घरीच राहायला सांगितलं आहे. "मी तरीही येत राहतो. घड्याळं दुरूस्त कराय ना," ते म्हणतात. २०१४ पर्यंत त्यांना रू. ८,००० - १२,००० मिळायचे, पण दुकानाच्या नवीन मालकाच्या मते त्यांच्या विंटेज घड्याळांमधील हातोटीला तितकी मागणी नसेल म्हणून गेल्या ५-६ वर्षांपासून त्यांना महिन्याला रू. ४,५०० पगार मिळतो.
"कोरोना येण्याआधी पण माझ्याकडे दुरुस्तीला थोडीच घड्याळं असायची. आता आठवड्याला एखाद दोन," हबीबुर म्हणतात. त्यांना एप्रिल व मे महिन्यांत पगार मिळाला नाही, पण जूनपासून पूर्ण पगार मिळतोय. "पगारात कपात केली असती तर मला जिणं कठीण झालं असतं." हबीबुर आणि त्यांच्या पत्नी, ५५ वर्षीय झुलेखा बेगम, यांची कमाई मिळून त्यांचं घर चालतं. टाळेबंदीपूर्वी त्या कपडे शिवून महिन्याला रू. ४,०००-५,००० कमवत होत्या.
हबीबुर वयाच्या १५व्या वर्षी कामाच्या शोधात विशाखपट्टणमला आले. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील पार्लाखेमुंडी शहरात त्यांच्या घरी त्यांचे वडील घड्याळं बनवायचे. ते विशीत होते तेव्हा विशाखपट्टणममध्ये जवळपास २५०-३०० वॉच मेकॅनिक होते, त्यांना आठवतं. "आता जेमतेम ५० असतील," ते म्हणतात. "महामारी गेल्यावर कदाचित एकही उरणार नाही."
त्यांनी आपलं कौशल्य आपल्या चार मुलींपैकी सर्वांत धाकटीकडे सुपूर्त केलंय; इतर तिघींची लग्न झाली आहेत. "तिला आवडतं," ते आपल्या बी. कॉम. करणाऱ्या १९ वर्षीय मुलीबद्दल म्हणतात. "मला वाटतं तिने आजवरच्या सर्वोत्कृष्ट वॉच मेकॅनिकच्या पंक्तीत जाऊन बसावं."
हबीबुर यांचं आणखी एक स्वप्न आहे: त्यांना स्वतःच्या घड्याळांचा ब्रँड प्रस्थापित करायचाय. "घड्याळ दुरुस्त करणं म्हणजे जवळपास काळच नीट करण्यासारखं आहे," हबीबुर म्हणतात. "मला माझ्या वयाची फिकीर वाटत नाही. जोवर घड्याळावर काम करतोय, तोवर कितीही वेळ गेला तरी फरक पडत नाही. मी त्यावर लागेल तेवढा वेळ काम करतो. मला विशीत असल्यागत वाटतं."
अनुवाद: कौशल काळू