छोटंसं, रया गेलेलं एक घर. साताऱ्याच्या काटगुण गावासाठी खरं तर ही वास्तू म्हणजे मानाचा बिंदू असायला हवी, आणि कदाचित तशी ती असेलही. मात्र स्थानिक पंचायतीच्या मात्र ती गणतीतही नाही. एवढंच काय महाराष्ट्र शासनाच्याही ती स्मरणात नाही.
ही वास्तू म्हणजे महान समाज सुधारक जोतिबा फुल्यांचं पिढीजात घर, त्यांच्या आजोबांनी बांधलेलं. आज त्याला अगदीच अवकळा आलीये. छत कोसळायला लागलंय. गरिबांसाठी राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतली घरंही याहून बरी म्हणावीत. घरकुल योजनेखाली हे घर परत कसं तरी बांधलं असावं ही एक शक्यता.
खरं तर हे घर इतकं लहान आहे की ते साफ आणि दुरुस्त करणं काहीच अवघड नाही. पंचायतीने याच घराच्या मागे एक जिम बांधलंय, त्यावरून तरी देखभालीसाठी पैशाची कमी असावी असं वाटत नाही. घराच्या थेट समोर फुल्यांच्याच नावाची एक शैक्षणिक संस्था आहे. रस्त्यालगत एक खुला मंचही आहे.




