सोहन सिंग टिटांच्या शब्दकोषात भीती हा शब्द नाहीच. त्यांनी आजवर अनेकांचे जीव वाचवले आहेत. जमिनीवर किंवा पाण्याखाली. भुले चाक गावातल्या रस्त्यांवर किंवा आसपास नेहमी दिसणारं एक दृश्य म्हणजे धूर आणि धुळीच्या लोटातून आपल्या मोटरसायकलवर ताजी, पौष्टिक भाजी विकायला येणारे टिटा. देवदेवतांभोवती असतं तसं वलय असतं त्यांच्या भोवती. त्यांची खरी ओळख मात्र वेगळीच. पाण्याच सूर मारायचं त्यांचं कसब. पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातल्या आपल्या गावाच्या आसपासच्या कालव्यांमध्ये उडी घेत ते लोकांना सुखरूप काठावर आणतात.
“लोकांना बुडण्यापासून वाचवणं हे काही माझं काम नाही. पण मी ते करतो,” ४२ वर्षीय सोहन सांगतात. गेली २० वर्षं ते नेमाने हे काम करतायत. “तुम्हाला वाटतं, ‘पाणी म्हणजे जीवन’. पण मी किमान हजारदा हेच पाणी जीवघेणं ठरताना पाहिलंय,” टिटा सांगतात. आजवर, इतक्या वर्षांत पाण्यातून किती मृतदेह बाहेर काढलेत त्यासंबंधी ते बोलत असतात.
गुरदासपूर आणि शेजारच्या पठाणकोट जिल्ह्यात कुणी जर कालव्यात पडलं तर सुटका करण्यासाठी किंवा पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पहिला फोन टिटांनाच जातो. ही व्यक्ती अपघाताने पडली की जीव देण्यासाठी, या भानगडीत आपण पडत नाही असं सांगत टिटा म्हणतात, “कुणी तरी पाण्यात पडलंय असं कळताक्षणी मी आधी पाण्यात उडी टाकतो. शक्यतो माणूस जिवंत हाती लागावा हीच इच्छा असते.” जर का जीव गेला असेल तर, “नातेवाइकांना किमान शेवटी एकदा चेहरा तरी पाहता यावा असं वाटतं,” ते अगदी निश्चल आवाजात सांगत असले तरी हजार मृत्यूंचं दुःख त्यांच्या आवाजात दाटलेलं असतं.
टिटा दर महिन्याला कालव्यातून किमान २-३ मृतदेह बाहेर काढतात. या सगळ्याचं त्यांचं एक तत्त्वज्ञान आहे. “आयुष्य हे वावटळीसारखं आहे,” ते मला सांगतात. “एक चक्र आहे. संपतं त्याच क्षणी सुरू होतं.”
भुले चाकजवळचे शाखा कालवे पंजाबच्या गुरदासपूर आणि इतर जिल्ह्यांना रावी नदीचं पाणी पुरवणाऱ्या अप्पर बडी दोआब (यूबीडीसी) कॅनॉल या २४७ कालव्यांच्या जाळ्याचा भाग आहेत. पाणी वाटप यंत्रणेचं ऐतिहासिक मोल आहे. रावी आणि बियास नदीच्या मधल्या दोआब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूभागाला कालव्यांच्या या जाळ्याद्वारे पाणी पोचवलं जातं.
मुघल सम्राट शहाजहाँ याने सतराव्या शतकात पहिल्यांदा कालव्यांचं जाळं उभं केलं होतं. त्यावरच आजची यंत्रणा उभारण्यात आली आहे. शहाजहाँनंतर महाराजा रणजीत सिंग यांनी त्यात भर घातली आणि एकोणिसाव्या शतकात इंग्रज राजवटीत सिंचन कालव्यांचं जाळं विकसित झालं. आज हेच कालवे यूबीडीसी दोआबमधल्या अनेक जिल्ह्यांमधून वाहतात आणि त्या पाण्यावर ५.७३ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते.
भुले चाकचे लोक या कालव्याला 'बडी नहर' म्हणतात. लहानपण याच कालव्याशेजारी गेल्यामुळे सोहन किती तरी वेळ तिथेच आसपास खेळत असायचे. “मी मित्रांबरोबर पोहायला जायचो. सगळेच लहान होतो. हे कालवे आणि ओढे किती जीवघेणे ठरू शकतात हे आमच्या ध्यानीमनीही नसायचं” ते म्हणतात.
२००२ साली त्यांनी पहिल्यांदा कालव्यातून मृतदेह बाहेर काढला. कालव्यात कुणी तरी बुडालं म्हणून सरपंचांनी त्यांना पहायला सांगितलं. “मला मृतदेह मिळाला आणि मी तो काठावर घेऊन आलो,” ते म्हणतात. “मुलगा होता. त्याचा देह हातात घेतला तेव्हापासून माझं पाण्याशी असलेलं नातं कायमचं बदलून गेलं. जड जड वाटायला लागलं पाणी, आणि मनही. त्या दिवशी माझ्या ध्यानात आलं की नदी, कालवा, समुद्र किंवा महासागर, कुठल्याही पाण्याला जीव हवा असतो,” टिटा सांगतात. “पटतंय का तुम्हाला?”
पन्नास किलोमीटरच्या परिघातल्या बाटला, मुकेरियाँ, पठाणकोट आणि टिबरी या गावातले लोक अशी काही वेळ आली तर टिटांनाच बोलावतात. लांब जायचं असेल तर कुणी तरी टिटांना दुचाकीवर मागे बसवून घेऊन जातं. नाही तर ते आपली हातगाडी जोडलेली मोटारसायकल घेऊन अपघाताच्या ठिकाणी पोचतात.
टिटा सांगतात की कधी कधी एखाद्याचा जीव वाचवला किंवा पाण्यातून मृतदेह बाहेर काढल्यावर नातेवाईक ५०००-७००० रुपये बक्षीस म्हणून देतात. पण त्यांना ते पैसे घ्यायला आवडत नाही. दिवसभरात भाजी विकून मिळणारे २००-४०० रुपये हीच त्यांची कमाई आहे. त्यांच्याकडे जमीन नाही. आठ वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ते त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा सांभाळ करतायत आणि आपल्या ६२ वर्षांच्या आईचीही काळजी घेतायत.
कधी कधी संकट अचानक समोर येतं, टिटा म्हणतात. तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग. टिबरीजवळ कालव्यात एका बाईला उडी मारताना त्यांनी पाहिलं. त्यांनीही लगेच पाण्यात उडी घेतली. “ती चाळिशीच्या पुढची होती. ती काही मला तिला बाहेर काढू देईना. उलट मलाच खाली पाण्यात खेचू लागली,” टिटा सांगतात. तिला वाचवण्यासाठी १५-२० मिनिटं ही झटापट सुरू होती. त्यांनी तिचे केस पकडून ठेवले आणि तिला पाण्यातून बाहेर काढलं. “तोपर्यंत तिची शुद्ध हरपली होती.”
टिटा यांना पाण्याखाली खूप वेळ श्वास रोखून धरता येतो हे त्यांचं खरं कसब. “विशीत असताना मी सलग चार मिनिटं पाण्याखाली श्वास रोखून धरु शकत होतो. आता तीन मिनिटं तरी जमतं.” ते प्राणवायूची टाकी वापरत नाहीत. “ती कुठे शोधत बसणार? तेही अशा तातडीच्या प्रसंगात,” ते म्हणतात.
सहाय्यक उप निरीक्षक राजिंदर कुमार जिल्हा गुन्हे नोंदणी कार्यालयाचे प्रमुख आहेत. ते सांगतात की २०२० साली पोलिसांनी गुरदासपूरमधल्या अप्पर बडी दोआब कॅनॉलमधून पाणबुड्या जीवरक्षकांच्या मदतीने चार मृतदेह बाहेर काढले होते. २०२१ साली त्यांनी पाच मृतदेह बाहेर काढले. फौजदारी कायद्याच्या कलम १७४ खाली गुन्हा नोंदवण्यात आला जेणेकरून पोलिसांना हा मृत्यू आत्महत्या आहे का घातपात का अपघात याची चौकशी करता यावी. तसंच काही संशयास्पद परिस्थितीत व्यक्ती मरण पावली आहे का तेही पाहता यावं.
“लोक जीव देण्यासाठी कालव्यात उडी टाकतात,” राजिंदर सिंग सांगतात. “कधी कधी त्यांना पोहता येत नसतं, पण अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरतात आणि मग बुडून जीव जातो. कधी कधी पाय घसरून पडतात आणि पाण्यात बुडतात. इतक्यात कुणाला पाण्यात बुडवून मारल्याचा गुन्हा नोंदवला गेलेला नाही,” ते सांगतात.
२०२० साली पोलिसांनी गुरदासपूरमधल्या अप्पर बडी दोआब कॅनॉलमधून पाणबुड्या जीवरक्षकांच्या मदतीने चार मृतदेह बाहेर काढले
टिटा सांगतात की या कालव्यात सगळ्यात जास्त मृत्यू उन्हाळ्यात होतात. “उन्हाच्या तलखीपासून वाचण्यासाठी लोक कालव्याच्या पाण्यात उतरतात,” ते म्हणतात. “मृतदेह पाण्यावर तरंगतात आणि खास करून कालव्यात ते सहज सापडत नाहीत. त्यामुळे मला कालव्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन शोध घ्यावा लागतो. हे फारच जोखमीचं काम आहे. माझाच जीव धोक्यात घालून मी ते करत असतो.”
धोका असूनही टिटांनी हे काम करणं थांबवलेलं नाही. “मृतदेह शोधायला मी पाण्यात उतरलोय आणि मला तो मिळाला नाही असं आजवर एकदाही झालेलं नाही. पाण्यात बुडालेल्या लोकांना वाचवणाऱ्या आमच्यासारख्यांना शासनाने नोकरी द्यायला पाहिजे. माझ्यासारख्या माणसाला त्याचा फार मोठा आधार होईल,” ते म्हणतात.
“माझ्याच गावात डझनभर लोक आहेत जे असे पाण्यात उड्या टाकू शकतात,” टिटा म्हणतात. ते लबाना शीख समुदायाचे आहेत आणि पंजाबात त्यांची नोंद इतर मागासवर्गीयांमध्ये होते. “शासन याकडे काम म्हणून पाहत नाही, त्यासाठी मोबदला तर दूरचीच गोष्ट आहे,” ते संतापून म्हणतात.
कधी कधी पाण्यात शोधूनही मृतदेह सापडत नाही. अशा वेळी इतर चार पाच लोक टिटांबरोबर पाण्यात उतरतात. २३ वर्षीय गगनदीप सिंग त्यापैकीच एक. तो देखील लबाना शीख समाजाचा आहे. २०१९ साली तो पहिल्यांदा पाण्यातून मृतदेह काढण्यासाठी टिटांबरोबर गेला. “मी मृतदेह शोधण्यासाठी म्हणून पहिल्यांदा जेव्हा पाण्यात उतरलो तेव्हा मला भीती वाटत होती. पण भीती जावी म्हणून मी वाहेगुरूचा धावा केला,” तो सांगतो.
दहा वर्षांच्या एका मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला त्या प्रसंगाचे वण आजही मनावर तसेच आहेत. “तो इथल्याच घोत पोखर गावचा होता. पब-जी खेळतो म्हणून आई त्याला ओरडली. अभ्यास करत नाही म्हणून तिने त्याला कानाखाली मारली. त्याने सरळ गाझीकोटमध्ये कालव्याच्या पाण्यात उडी टाकली,” गगनदीप सांगतो.
त्याच्यासोबत आणखी दोघं पाणबुडे होते. त्यातला एक भुले चाकहून २० किलोमीटर लांब असलेल्या धारीवालहून आला होता. त्याने सोबत प्राणवायूची टाकी आणली होती. “त्याने मला सिलिंडर दिला आणि मी पाण्यात उतरलो. मी दोन तास पाण्यात होतो. दिवसभर शोध घेतल्यानंतर आम्हाला पुलाखाली त्याचा मृतदेह अडकलेला सापडला. फुगून वर आला होता. इतका देखणा मुलगा होता. त्याच्या मागे आता आई-वडील आणि दोघी बहिणी आहेत,” तो सांगतो. गगनदीप स्वतः देखील ऑनलाइन गेम खेळायचा. पण या प्रसंगानंतर ते बंद झालं. “माझ्या फोनवर पब-जी आहे. पण आता मी बिलकुल खेळत नाही.”
आतापर्यंत गगनदीपने तीन मृतदेह पाण्यातून बाहेर काढलेत. “या कामाचे मी काहीही पैसे घेत नाही. त्यांनी दिले तरी घेत नाही,” तो सांगतो. त्याला सैन्यात जायची इच्छा आहे. तो आपल्या आई-वडलांसोबत दोन खोल्यांच्या घरात राहतो. गावातल्या गॅस वितरण कंपनीत सिलिंडर घरपोच पोचवण्याचं काम करतो. महिन्याला ६,००० रुपये पगार मिळतो त्याला. या कुटुंबाची एकरभर जमीन आहे. गहू आणि चाऱ्याचं पीक घेतात आणि काही शेरडं पाळली आहेत. त्याचे वडील आता साठीच्या पुढे आहेत. त्यांची स्वतःची रिक्षा आहे. गगनदीप कधी कधी रिक्षाही चालवतो.
कालव्यामध्ये उडी घेतल्यावर त्यातल्या कचऱ्यातून वाट काढत पुढे जावं लागतं. त्यामुळे मृतदेह शोधण्याच्या कामाला जास्त वेळ लागतो.
२०२० साली पोलिसांनी गगनदीपला असाच एक मृतदेह काढण्यासाठी बोलावलं होतं. धारिवाल गावात एक १९ वर्षांचा तरुण कालवा पार करून जात असताना पाण्यात बुडाला होता. “तो बुडाला त्यानंतर दोन तासांनी मी तिथे पोचलो होतो,” तो सांगतो. “मी सकाळी १० वाजता शोधकामाला सुरुवात केली. दुपारचे ४ वाजून गेले तरी मला काही तो सापडेना.” गगनदीपने कालव्याच्या एका बाजूच्या भिंतीला रस्सीचं एक टोक आणि दुसरं दुसऱ्या भिंतीला बांधलं. त्यानंतर तिघांनी मिळून मानवी साखळी तयार केली आणि एकाच वेळी पाण्यात उडी घेतली. “त्या मुलाचा मृतदेह शोधणं सर्वात कठीण होतं कारण प्रचंड कचरा होता. एक मोठा दगड मध्ये आल्याने त्याचा मृतदेह एकाच ठिकाणी अडकला होता.”
हे काम करता करता त्याला भौतिकशास्त्राचे काही नियम अगदी पक्के कळून चुकलेत. “मृतदेह तरंगून पाण्यावर यायला किमान ७२ तास लागतात. आणि तो पाण्याबरोबर वाहत जातो. एखाद्याने अ ठिकाणाहून पाण्यात उडी टाकली तर तो तुम्हाला त्या जागी सापडत नाही,” गगनदीप सांगतो. २०२१ साली टिबरीच्या कालव्यात एका सोळा वर्षांच्या मुलाचा मृतदेह शोधतानाचा अनुभव तो सांगतो. “त्या मुलाने जिथून उडी टाकली तिथे मी शोधत बसलो. पण मला काही तो मिळेना. त्यानंतर मी नाकात एक नळी घातली आणि ती एका पाइपला जोडली, जेणेकरून पाण्यात श्वास कमी पडणार नाही,” तो सांगतो.
पार संध्याकाळ झाली तेव्हा कुठे त्या मुलाचा मृतदेह मिळाला. “कालव्याच्या पार त्या टोकाला, २५ फूट खोल पाण्यात होता. सोहन आणि मी दोघंही शोधत होतो,” तो सांगतो. “सोहन म्हणाले की आपण उद्या येऊन पाण्यातून बॉडी काढू या. पण आम्ही जेव्हा त्याच जागी उतरलो तर तिथे बॉडी नव्हतीच. ती दुसऱ्या किनाऱ्याला जाऊन कालव्याच्या तळाशी जाऊन बसली होती.” या दोघांना ती बाहेर काढायला तीन तास लागले. “आम्ही किमान २०० वेळा पाण्याच्या आत बाहेर केलं असेल. कधी कधी हे आपण काय करतोय असा प्रश्न मला पडतो... पण हे काम थांबवावं असं काही वाटत नाही,” गगनदीप म्हणतो.
आयुष्याची गुंतागुंत, जीवनाची क्लिष्टता पाण्यात कळते असं टिटांना वाटतं. त्यामुळे ते रोज संध्याकाळी किंवा जमेल तेव्हा टिबरीच्या पुलावर जातात. “आताशा पोहण्यात मजाच येत नाही. प्रत्येक प्रसंगाची आठवण मी माझ्या काळजातून काढून टाकायचा प्रयत्न करतो,” ते म्हणतात. “आम्ही जेव्हा पाण्यातून मृतदेह बाहेर काढतो तेव्हा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचे नातेवाईकही थोडे थोडे मरत असतात. रडतात. मृतदेह घेऊन जाताना आणि उराशी एकच खंत असते – हे असं मरण येऊ नये, बस्स.”
हा कालवा आणि त्याच्या पाण्याने सोहन सिंग टिटांच्या मनावर गारूड घातलंय. २००४ साली त्यांना मोरोक्कोत नोकरीची आणि राहण्याची संधी मिळाली. अटलांटिक समुद्र आणि भूमध्य समुद्राने वेढलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या या देशात असतानाही त्यांना त्यांच्या चिरपरिचयाच्या कालव्याची आठवत सतावत होती. तिथे पडेल त्या कामातून भागेनासं झालं आणि चार वर्षांतच ते मायदेशी परत आले. “तिथे असताना मला टिबरीची सतत आठवण येत असे. अगदी आजसुद्धा मी रिकामा असलो की कालव्यापाशी येतो. नुसता पाहत बसतो,” दिवसभराचं काम सुरू करण्यापूर्वी ते सांगतात. त्यानंतर भाजीची गाडी मोटरसायकलला जोडून ते रस्त्यात पुढच्या वळणावरच गिऱ्हाइकांच्या शोधात निघतात.
या वार्तांकनासाठी सहाय्य केल्याबद्दल सुमेधा मित्तल यांचे आभार.
जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमच्या ओळखीचं कुणी तणावाखाली असेल तर किरण या राष्ट्रीय हेल्पलाइन शी संपर्क साधा – १८००-५९९-००१९ (२४ तास, टोल फ्री) किंवा तुमच्या जवळच्या यापैकी कोणत्याही हेल्पलाइनशी संपर्क साधा. मानसिक आरोग्यासाठी सेवा आणि सेवादात्यांची माहिती हवी असल्यास, एसपीआयएफ ने तयार केलेल्या या सूचीची अवश्य मदत घ्या.