तपन मोंडल यांना बरेच जण अण्णा अशी हाक मारतात कारण त्यांच्या आणि रजनीकांतच्या चेहऱ्यात साम्य आहे (आणि रजनीकांतला दक्षिणेकडे अण्णा म्हटलं जातं). पण मोंडल यांची ख्याती वडोदऱ्यात वेगळ्याच कारणासाठी आहे – कदाचित या शहरातला ते एकटेच असे मूर्तीकार असतील जे ५ ते ९ फुटी मूर्ती घडवतात तेही मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नाही.
आणि गणपती आणि इतर देवी देवतांच्या मूर्ती घडवत असताना ते पश्चिम बंगालच्या मूर्तीकलेचं तंत्र वापरतात. “या मातीच्या मूर्तींचे साचे कुमारतुलीचे आहेत जे मी इथे घेऊन आलोय – २००० किमी दूर बंगालहून,” ते म्हणतात.
तपन यांचा कारखाना – शहरातल्या सुमारे ३० पैकी एक – ज्याचं नाव आहे कृष्णा प्रतिमालय, वडोदऱ्याच्या मध्यभागात असलेल्या पंचवटी इथे आहे. इथे एका सिमेंटच्या पत्र्याखाली साचे, रंग, माती आणि इतर अवजारं ठेवलेली आहेत. हंगाम जोरावर असतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला बांबू आणि वर प्लास्टिकचा कागद टाकून शेड बांधली जाते, जिथे गणपतीच्या उंच मूर्ती घडवल्या जातात.
इथे वर्षभर लगबग सुरू असते – गणपती, दुर्गा, विश्वकर्मा, सरस्वती आणि इतरही देवतांच्या मूर्ती सण आणि मागणीप्रमाणे तयार केल्या जातात. दर वर्षी तपन आणि त्याचे साथीदार गणपतीच्या ५-९ फुटी उंच १० तरी मूर्ती तयार करतात – अर्थात आगाऊ ऑर्डर असली तर. या एकेका मूर्तीची किंमत रु. २०,००० ते रु. १ लाख इतकी असू शकते, ते सांगतात. गणपतीच्या तीन फुटी २०-३० आणि छोट्या आकाराच्या ४०-५० मूर्तीदेखील ते घडवतात ज्यांची किंमत रु. २,००० ते रु. १०,००० इतकी असते.











