“फेंक देबे, खदान में गाड देबे.”
खप्टिहा कलां गावच्या रहिवासी असणाऱ्या मथुरिया देवींना रेती उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराने चक्क अशा रितीने धमकावलं होतं. त्या सांगतात की तो भयंकर संतापला होता. बुंदेलखंड प्रदेशातली महत्त्वाची नदी असणाऱ्या केन नदीचा जीव घोटणाऱ्या या रेती उपशाविरोधात १ जून रोजी त्यांच्यासबोत २० इतर शेतकरी देखील आले होते.
त्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत या शेतकऱ्यांनी केन नदीमध्ये उभं राहून जल सत्याग्रह केला होता. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये उगम पावणारी ही नदी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ४५० किलोमीटर वाहत जाते आणि बांदा जिल्ह्यातल्या चिल्ला गावात यमुनेला जाऊन मिळते. २,००० लोकसंख्या असणारं मथुरिया देवींचं गाव या जिल्ह्याच्या तिंडवारी तालुक्यात आहे.
पण इथल्या काही गावांमधून वाहणाऱ्या केन नदीला आता ग्रहण लागलं आहे. कारण इथलेच काही लोक नदीच्या दोन्ही काठांवर उपसा करतायत. आणि हे रेती माफिया दोन खाणकाम कंपन्यांसाठी काम करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. हा उपसा अवैध आहे, ६३ वर्षीय मथुरिया देवी म्हणतात. केन नदीच्या काठी त्यांची १ बिघ्याहून थोडी जास्त म्हणजेच अर्धा एकर जमीन आहे. या उपशामुळे इथली शेती आणि उपजीविका धोक्यात आल्या आहेत.
“आमच्या जमिनी ते खणत चाललेत – बुलडोझर लावून १०० फूट खोल जायला लागलेत,” त्या सांगतात. २ जून रोजी नदीच्या काठीच त्या माझ्याशी बोलत होत्या. दोन अनोळखी तरुण त्यांचा एक व्हिडिओ तयार करत होते. “आमची झाडं तर या आधीच त्यांनी तोडून टाकलीयेत. कधी काळी आम्ही या नदीचं पाणी घेत होतो आता त्या नदीचा जीव घोटायला लागलेत. आम्ही पोलिसातही गेलो पण आमचं कुणीही काही ऐकत नाही. धमकावल्यासारखंच वाटतंय आम्हाला...”
रेती उपशाला होणारा विरोध कधी नव्हे तर जातीच्या भिंती मोडू शकला. दलित असलेल्या मथुरिया देवी आणि ठाकूर कुटुंबातल्या छोट्या शेतकरी असलेल्या सुमन सिंग गौतम या संघर्षात एकत्र आल्या. ३८ वर्षांच्या सुमन विधवा आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मालकीच्या एक एकर जमिनीतली रेती या माफियांनी उपसली आहे. “आम्हाला घाबरवण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार देखील केलाय,” त्या सांगतात.
खप्टिहा कलां गावातले शेतकरी प्रामुख्याने गहू, हरभरा, मोहरी आणि मसूर पिकवतात. “माझ्या मालकीच्या १५ बीसवां जमिनीत सरसों (मोहरी) उभी होती, तरी त्यांनी मार्च महिन्यात तिथे रेती काढायला सुरुवात केली,” सुमन सांगतात.


















