गेला महिनाभर निशा यादव आपल्या कुटुंबाच्या रेशनसाठी पायपीट करतीये. तिच्या शेजारचा किराणा दुकानदार त्यांना आता काहीच विकत देत नाहीये. "जेव्हापासून पप्पांना भरती केलंय, राजनवाला [किराणा दुकानाचा मालक] त्याच्या दुकानात आम्हाला पाय ठेवू देत नाही," ती म्हणते.
"जूनच्या अखेरीस माझ्या वडलांचा कोविड-१९ चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला, पण ते पूर्ण बरे झाले," निशा सांगते. "बाकी आम्ही सगळे स्वतःहून दोन आठवडे वेगळं राहिलो. पप्पांना बरं होऊनही महिना झालाय, तरी दुकानदार म्हणतो की त्याच्या दुकानात आलो तर आम्ही व्हायरस पसरवू. म्हणून आता आमच्यातल्या एकाला पावसापाण्यात गुडघाभर चिखल तुडवत इथून एखाद मैल लांब राहणाऱ्या नातलगांकडून किराणा आणावा लागतोय."
२४ वर्षीय निशा उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हाटा तालुक्यातल्या सोहसा मठिया गावात राहते. ती इयत्ता ११वी पर्यंत शिकली मात्र सहा वर्षांपूर्वी तिने शिक्षण सोडलं. गोरखपूर शहरापासून अवघ्या ६० किलोमीटरवर असलेल्या या गावाला अतिवृष्टी आणि पुराचा चांगलाच फटका बसलाय.
"आमचे बुआ-फुफा (आत्याचे यजमान) आमच्यासाठी किराणा विकत घेऊन ठेवतात अन् आम्ही त्यांना नंतर पैसे देतो." ती बोलता बोलताच आपली सलवार खालून तीन चारदा दुमडून घेते – त्यांच्या घरी तिला पुराच्या पाण्यातून जावं लागणार आहे. तिच्या घरी संध्याकाळच्या चहाला साखर शिल्लक नाही.







