“हर नफ़्स को मौत का मज़ा चखना है (प्रत्येक जिवाला मरणाची चव चाखावीच लागेल),” कोरलेला एक संदेश आपल्याला दिसतो. भविष्यवाणी म्हणून नाही तर नवी दिल्लीतल्या जदीद एहल-इ-इस्लाम या मोठ्या दफनभूमीतल्या कबरीवर हा कोरलाय.
ही ओळ - كُلُّ نَفْسٍ ذَائِقَةُ الْمَوْتِ – कुराणातली आयत आहे. प्रामुख्याने मुसलमानांच्या या दफनभूमीवर झाकोळ पसरलेला असताना त्यात या ओळीने एक प्रकारचा सुकून आणि उदासी मिसळून गेलीये. आणखी एक मृतदेह घेऊन अँब्युलन्स येते. जिवलग गेलेल्या व्यक्तीसाठी अखेरची प्रार्थना म्हणतात. आणि क्षणात गाडी रिकामी आणि कबर भरते. यंत्राच्या सहाय्याने माती लोटली जाते.
या दफनभूमीच्या एका कोपऱ्यात – बहादूर शाह जफर मार्गावर माध्यमांची कार्यालयं ज्या इमारतींमध्ये आहेत तिथून जवळच आपल्याला ६२ वर्षीय निज़ाम अख्तर दिसतात. ते कबरींवरच्या चिऱ्यांवर – ज्यांना ते मेहराब म्हणतात गेलेल्यांची नावं कोरतायत. दोन बोटात परकज़ा (सुलेखनासाठीचा कुंचला) पकडून हलक्या हाताने ते एक नुक्ता रंगवतात. या एका छोट्या बिंदूवर ऊर्दू अक्षरांचे उच्चार ठरतात. ते लिहित असलेला शब्द होता दुरदाना – कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव.
निज़ाम कबरींवर गेलेल्या व्यक्तीचं नाव आणि सोबत काही ओळी रंगवतायत. अतिशय सफाईदार आणि तितकंच क्लिष्ट सुलेखन ते करतात. त्यांचं काम झालं की त्यांचाच एक सहकारी त्यांनी लिहिलेली अक्षरं छिन्नीने कोरून काढेल. आणि हळू हळू रंग नाहीसा होईल.
गेली चाळीस वर्षं कातिब असलेले निज़ाम कबरींवर गेलेल्या व्यक्तींची नावं लिहितायत. “आजवर किती कबरींवर नावं लिहिलीत ते काही लक्षात नाही,” ते म्हणतात. “यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात कोविडने मरण पावलेल्या १५० जणांची आणि कोविडशिवाय इतर कारणांनी गेलेल्या तितक्याच लोकांची नावं मी लिहिली आहेत,” ते सांगतात. सगळं काम ऊर्दूमध्ये. दुसऱ्या बाजूला गेलेल्या व्यक्तीचं केवळ नाव इंग्रजीत दिसतं. “एका सेकंदात पानभर लिहिलं, असं काम नाहीये हे,” मी झरझर लिहून घेत होतो त्याची चेष्टा करत हलकं हसून ते म्हणतात.













