“जेव्हा ही मोठाली झाडं उन्मळून, तुटून पडलेली पाहतो ना तेव्हा असं वाटतं जसं काही पोटची लेकरंच गेली आहेत,” चाळिशी पार केलेले माळी मदन बैद्य म्हणतात. “माझं अख्खं आयुष्य मी या झाडांसोबत-वेलवनस्पतींसोबत काढलंय,” ते सांगतात. आजूबाजूला झालेल्या संहाराचा प्रचंड धक्का त्यांना बसलाय. “ही काही फक्त झाडं नाहीयेत. किती तरी पक्षी आणि फुलपाखरांसाठी निवारा आहेत ही झाडं. उन्हापासून सावली देतात, पावसापासून छप्पर.” कोलकात्याच्या ईस्टर्न मेट्रोपोलिटन बायपासवरची, शहीद स्मृती कॉलनीतली त्यांच्या घराजवळच्या बैद्यंच्या रोपवाटिकेचं प्रचंड नुकसान झालंय.
२० मे रोजी अम्फान वादळात किमान ५,००० झाडं उन्मळून इतस्ततः फेकली गेली असल्याचा कोलकाना महानगरपालिकेचा अंदाज आहे. ‘अति तीव्र चक्रीवादळ’ या वर्गात मोडणारं अम्फान पश्चिम बंगालच्या किनारी भागात धडकलं तेव्हा त्याचा वाऱ्याचा वेग ताशी १४०-१५० किलोमीटर होता आणि वाऱ्याचे झोत तर ताशी १६५ किमी वेगाने वाहत होते. वादळादरम्यान २४ तासात २३६ मिमी पाऊस झाला असं भारतीय वेधशाळेच्या अलिपोर शाखेच्या नोंदी सांगतात.
अम्फानमुळे ग्रामीण भागात, खासकरून सुंदरबनसारख्या भागांमध्ये काय नुकसान झालंय याचा आताच्या घडीला अदंजा बांधणं देखील शक्य नाहीये. नॉर्थ २४ परगणा आणि साउथ २४ परगणा आणि कोलकात्याला प्रचंड तडाखा बसला. राज्यभरात आतापर्यंत ८० जणांचा बळी गेला, ज्यातले १९ कोलकात्यातले आहेत.
अनेक भागांचा संपर्क आजही तुटलेला आहे. दळणवळणाची साधनं, रस्त्यांचं नुकसान त्यात सध्याच्या टाळेबंदीचे निर्बंध म्हणजे तिथे कुणालाही जाणं जवळपास अशक्य झालं आहे. अर्थात टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्या त्या पलिक़डच्या आहेत. सगळ काही पूर्वपदावर आणणं अतिशय अवघड होऊन बसलंय कारण एरवी ज्या कामगारांनी हे सगळं काम केलं असतं ते शहर सोडून आधीच इथल्या किंवा इतर राज्यातल्या आपापल्या गावी निघून गेले आहेत.














