“माझी मुलं दिवसाही झोपतील, असा मी प्रयत्न करते. दिवसभर मुलं घरातच राहातील, असं पाहाते. म्हणजे आजुबाजूची मुलं खातायत, जेवतायत ते त्यांना दिसणार नाही...” देवी कनकराज (नाव बदललंय) सांगते. १४ एप्रिलला आम्ही बोलत होतो. त्या दिवशी आणखी जेमतेम दोन दिवस पुरेल, एवढंच सामान होतं तिच्या घरात. “मुलांना मी पोटभर घालूच शकत नाहीये. मदत करेल, असंही कोणी नाही मला,” ती सांगत होती.
अरुंथथियार हा तामिळनाडूमधला गरीब, दलित समाज. अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट. २८ वर्षांची देवी विरुधुनगर जिल्ह्यातल्या एडयापोट्टलपट्टी पाड्यावर राहाते आणि साधारण २५ किलोमीटरवर असलेल्या शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात हप्त्याला मजुरीवर काम करते. इथल्या बऱ्याच बायका हेच काम करतात. २४ मार्चला कोविड-१९ टाळेबंदी लागू झाली, तोपर्यंत कारखान्यातल्या कामासाठी ती रोज २५० रुपये कमवत होती. रॉकेट ट्यूब्स आणि कागदाचे फटाके यांच्यात ठासून दारू भरण्याचं हे प्रचंड धोक्याचं काम.
एप्रिलच्या सुरुवातीला देवीला १५ किलो तांदूळ आणि एक किलो डाळ मिळाली. टाळेबंदीत राज्य सरकारने गरिबांना केलेली मदत होती ती. पण हे धान्य पटकन संपलं. “सरकारकडून आम्हाला (देवीच्या कुटुंबाला) १००० रुपयेही मिळाले. भाज्या आणि किराणा घेतला त्याचा. रेशनच्या दुकानांतून आम्हाला तेल दिलं नाही. जे आणलंय, ते सगळं मी पुरवून पुरवून वापरतेय. दिवसातून फक्त दोनदाच खातोय,” ती मला सांगत होती.
मे महिन्याच्या सुरुवातीला देवीच्या कुटुंबाला ३० किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक लिटर तेल आणि दोन किलो साखर मिळाली. दोन आठवड्यांनंतर त्यातला थोडासा तांदूळच शिल्लक होता. “भाज्या आणि किराणा आणायला पैसेच नाहीत आता,” ती म्हणाली. “सध्या फक्त लोणचं आणि भात खातोय.”
१८ मे ला विरुधुनगरचा लॉकडाऊन थोडा शिथिल करण्यात आला, कारण त्या जिल्ह्यात फारच थोडे कोविड १९ चे रुग्ण मिळाले होते. देवी त्या दिवशी कामाला गेली. तिला वाटलं, थोडे पैसे मिळाले तर आपल्या तीन मुलींना (वय १२, १० आणि ८) काहीतरी खायला घालता येईल. तिचा नवरा, ३० वर्षांचा आर. कनकराज (नाव बदललंय) ट्रक चालवतो. पण त्यातून मिळणारं बरंचसं उत्पन्न दारूतच बुडवतो.





