पायाखाली हिरवं गवत, वरती निरभ्र आकाश, भोवताली हिरवी गार झाडं आणि जंगलातून संथ वाहत जाणारा ओढा. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात हे असं चित्र कुठेही पहायला मिळू शकतं.
पण ते तितकंच नाहीये. गीताताई त्या माहितीत जराशी भर घालते. “बाया डाव्या हाताला आन् गडी उजव्या.” या वस्तीचे लोक सकाळी संडासला कुठे जातात त्याची ही विभागणी.
“आम्हाला घोट्याइतक्या पाण्यात बसावं लागतं बाई – पावसाळ्यात तर छत्री घेऊन. पाळीच्या चार दिवसात तर काय होतं तुला काय सांगायच?” चाळिशीची गीताताई सांगते.
तिच्या वस्तीत ५० घरं आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्याच्या कुरुळी गावाच्या वेशीवर असलेली ही वस्ती. प्रामुख्याने भिल आणि पारधी आदिवासींची. राज्यात अनुसूचित जमातींमध्ये गणल्या गेलेल्या या दोन्ही जमाती सर्वात गरीब तसंच वंचित समूहांपैकी आहेत.
भिल आदिवासी असणारी गीताताई असं उघड्यावर जायला लागतं त्याबद्दल फारशी खूश नाही. “गवत टोचतं, डास चावतात... कधी साप चावंल त्याची भीती राहती.”
दर वेळी जायचं तर पावला पावलाला कोण हल्ला करतंय का याची भीती असते. खास करुन स्त्रियांना जास्तच.




