एका दुपारी, बागलकोट-बेळगाव रस्त्यावर एस. बंदेप्पा आपला मेंढ्यांचा कळप घेऊन चालला होता तेव्हा माझी त्याची भेट झाली. आपल्या मेंढ्या शेतात बसवण्यासाठी तो एखाद्या शेतकऱ्याची जमीन शोधात होता. “मेंढ्यांच्या लेंडीची चांगली किंमत देणारे शेतमालक आम्ही शोधतो,” तो म्हणाला. ते हिवाळ्याचे दिवस होते, कुरुबा मेंढपाळ साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये चारणीला बाहेर पडतात; तेव्हा शेताची कामंही तुरळकच असतात.
तेव्हापासून मार्च-एप्रिल पर्यंत, अनुसूचित जमातीत गणले जाणारे कर्नाटकातील हे कुरुबा दोन-तीन कुटुंबांच्या गटात भटकंतीला बाहेर पडतात. साधारणपणे त्यांच्या नेहमीच्या वाटेने ते ६०० ते ८०० मैलांचा प्रवास करतात. त्यांची मेंढरं आणि शेरडं पडक रानात चरतात आणि त्यांच्या प्राण्यांच्या लेंड्यांच्या खताचा शेतकऱ्याकडून त्यांना मोबदला मिळतो. ‘चांगल्या’ जमीनमालकाकडून बंदेप्पाला काही दिवसांच्या एका थांब्याचे हजारेक रुपये मिळतात. मग तो पुढच्या थांब्याकडे निघतो, आणि वाटेवर जवळपासच्या इतर शेतकऱ्यांसोबत नवीन चांगला सौदा होईल का हे बघतो. पूर्वी त्याला धान्य, गूळ आणि कपडेदेखील मिळत पण आता शेतकऱ्यासोबत असा सौदा करणं कठीण होत चाललंय असं तो सांगतो.
“(हल्ली) जमीनमालकाच्या शेतात
मुलाबाळांना घेऊन राहणं सोपं नाही,” निलाप्पा चचडी म्हणतात. बेळगाव (आता बेळगावी)
जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील बैलहोंगल-मुनवल्ली रस्त्यावर माझी त्यांची भेट
झाली तेव्हा ते मेंढ्यांना रोखण्यासाठी शेताभोवती दोर बांधीत होते.
पण मेंढपाळ कुरुबांच्या पुढ्यात एवढा एकच बदल नाहीये. गेल्या २० वर्षांत, त्यांच्या दक्खनी जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीला असणारी मागणी कमी होत चाललीये. या मेंढ्या इथलं कोरडे हवामान सहन करू शकतात. पूर्वापारपासून, कुरुबांच्या उत्पन्नाचा मोठा भाग कांबळी (घोंगडी किंवा आंध्रात म्हणतात गोंगली) बनवण्यासाठी होणाऱ्या लोकरीच्या विक्रीपासून येत होता. मेंढ्यांच्या लेंडीखतापासून मिळणाऱ्या पैशाचा हातभार लागे. ही लोकर जवळच मिळत असे, स्वस्त असे आणि तिला मागणीही खूप असे.
बेळगावी जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्यातील दडीभावी सालापूर गावातील विणकर हे प्रामुख्याने त्यांचे खरेदीदार होते. त्यांपैकी बहुतेक कुरुबा जमातीच्या पोटजातीतीलच आहेत. (काही कुरुबा गावामध्ये कायमस्वरुपी घरं बांधून स्थाईक झालेले आहेत. त्यांच्या पोटजाती आहेत, मेंढपाळ, विणकर, शेतकरी इ.) पूर्वी त्यांनी विणलेली कांबळी सैन्यदलात लोकप्रिय होती पण आता त्यांना फारशी मागणी नाही. “आता ते (जवान) स्लीपिंग बॅग्ज वापरतात,” एक विणकर पी. ईश्वरप्पा सांगतात. दडीभावी सालापूर मध्ये त्यांचा एक खड्ड्यातील हातमाग (डबऱ्या माग) आहे आणि त्यावर ते आजही काळ्या घोंगड्या विणतात.
दडीभावी सालापूर पासून दोनशे किमी. अंतरावरच्या रानेबेन्नुर (जि. हावेरी) येथील एका दुकानाचे मालक दिनेश शेठ म्हणतात, “दक्खनी कांबळ्यांची मागणी कमी होण्याचं एक कारण म्हणजे मिश्र कृत्रिम धाग्यांची आणि इतरही प्रकारची स्वस्त पांघरुणं उपलब्ध आहेत.”
वीसेक वर्षांपूर्वी, कांबळ्यांची व रगची मागणी तेजीत होती तेव्हा या कुरुबा मेंढपाळांकडून विणकर ३० ते ४० रुपये किलो दराने लोकर घेत असत पण आता त्याना ती ८-१० रुपये दराने मिळते. स्थानिक दुकानात तयार ब्लँकेट ६००-८०० रुपयांना तर छोटी बसकरं २००-३०० रुपयात मिळतात. शिवाय हे उत्पन्नही कमी जास्त होत राहतं. माझ्या बोलण्यातून मला लक्षात आलं की १०० मेंढ्या बाळगणाऱ्या कुटुंबाला लोकर. खत आणि मेंढ्यांची विक्रीतून वर्षाला साधारण ७० ते ८० हजाराचं उत्पन्न मिळतं.
नियमित, स्थिर उत्पन्न मिळावं म्हणून दडीभावी सालापूर गावातील अनेक कुटुंबांतील स्त्रियांनी बचत गट स्थापन केलेत. या स्त्रिया आजही दक्खनी लोकर वळतात आणि घोंगड्या विणतात. आणि पुरुष शेती पाहतात.
आणि चरितार्थासाठी कुरुबा नवनवीन मार्गही शोधू लागलेत. मेकलमरडी गावातील (सांपगाव गट, ता. बैलहोंगल, जि. बेळगावी) येथील दस्तगीर जामदार, शरीराने थोडे अधू आहेत पण त्यांनी ताग, चामडे आणि लोकर यांतून पिशव्या आणि बसकरं विणायला सुरवात केली आहे. “या वस्तू स्थानिक बाजारात विकल्या जातात. कधी कधी बंगळूरूहून खरेदीदार येतात आणि थोडा फार माल जातो पण मागणीचा भरोसा नाही,” ते सांगतात.
काही मेंढपाळ आता त्यांची उपजीविका प्रामुख्याने आपली जनावरं (मांस व दूध यांसाठी) विकून मिळवण्याकडे वळत आहेत. कर्नाटक मेंढी व लोकर विकास महामंडळामार्फत राज्य सरकार दक्खनी जातीशिवाय इतर जातींना – लाल नेल्लोर, येल्गू, माडग्याळ - प्रोत्साहन देत आहे. या जाती लोकरीपेक्षा मांस अधिक देतात आणि आता कुरुबासुद्धा या जाती पाळू लागलेत. एका नर कोकराला रु. ८००० पर्यंत किंमत मिळते. पी. नागप्पा यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये तीन महिन्याचं एक कोकरू तुमकुर जिल्ह्यातील सिरा शहरात ६००० रुपयांना विकलं. आता या भागात बकरीच्या दुधाचा व्यवसाय वाढत असल्याने काही जण दुधासाठी बकऱ्या पाळू लागले आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून, मेंढपाळांसोबत काम करणाऱ्या एका स्थानिक पशुवैद्याने मला सांगितले की, आपली मेंढरं निरोगी दिसावीत म्हणून हल्ली काही कुरुबा त्यांना भरपूर औषधं देतात, तीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि बोगस विक्रेत्यांकडून घेऊन.
पुन्हा येऊ या बागलकोट-बेळगाव रस्त्यावर... एस. बंदेप्पा अजूनही योग्य अशा शेताच्या शोधात आहे. साधारण दहा वर्षांपासून उ. कर्नाटकातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीपेक्षा रासायनिक खतांकडे वळत आहेत. त्यामुळे मेंढ्यांच्या खतापासून मिळणारं उत्पन्न हे काही आता नियमित उपजीविकेचं साधन नाही. त्यामुळे बंदेप्पा व इतर मेंढपाळ वर्षभर शेतात कामं शोधतात.
शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यातील परंपरागत परस्परावलम्बित्व आता उतरणीला लागलंय. काही मेंढपाळ आपलं कुटुंब आणि बाडबिस्तरा घेऊन दूर दूर अंतरापर्यंत भटकंती करतात – समंजस, मायाळू शेतकरी आणि चराऊ जमिनींच्या शोधातील हा प्रवास अधिकाधिक कठीण होत चाललाय.
अनुवादः छाया देव