कुमारतुलीमधील कृष्णा स्टुडिओचे तापस पाल म्हणतात “या वर्षी कोरोनामुळे मला अद्यापपर्यंत दुर्गा मूर्तींची ऑर्डर मिळालेली नाही. तरीही मी स्वतःहून काही मूर्ती बनवल्या आहेत. मला आशा आहे त्या विकल्या जातील.” उत्तर कोलकात्यातील कुंभार आणि मूर्तिकारांच्या या ऐतिहासिक गल्लीमध्ये त्यांचा स्टुडिओ आहे. ते पुढे म्हणतात, “तुम्ही मला ८ वर्षांपासून ओळखता. माझा स्टुडिओ जून महिन्यात विनामूर्तीचा तुम्ही कधी पाहिला आहे का?”
कुमारतुली मध्ये जवळपास ४५० स्टुडिओंची स्थानिक कारागीर संघटनेमध्ये नोंदणी झाली आहे. बांबू व पेंढ्याचा ढाचा तयार करून त्यावर चिकणमातीचा लेप लावून मूर्ती घडवली जाते. ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या दुर्गापूजेच्या काही आठवडे आधीच मूर्ती रंगवून, दागिन्यांनी सजवल्या जातात. दरवर्षी मूर्ती बनवण्याची तयारी मार्च - एप्रिल मध्येच सुरु होते. परंतु या वेळी कोविड १९ च्या महामारीने पूर्ण नियोजनच बिघडवून टाकलं आहे. (पहा - कुमारतुलीचा फेरफटका)
मागील २० वर्षापासून मूर्ती बनवणारे मृत्युंजय मित्रा म्हणतात, हे वर्ष आमच्यासाठी फार कठीण आहे. एप्रिल पासूनच व्यवसायात प्रचंड तोटा व्हायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बनवलेल्या अन्नपूर्णा देवीसारख्या घरगुती देवतांच्या मूर्ती बंगाली नवीन वर्षाला, पैला-बैसाखीला (यावर्षी १५ एप्रिल रोजी) विकायला पाहिजे होत्या परंतु त्या अजूनही विकल्या गेलेल्या नाहीत. “संपूर्ण गल्ली मध्ये जवळपास १०० मूर्ती असतील त्यापैकी फक्त ८ ते १० मूर्ती विकल्या आहेत. पूर्ण गुंतवणूक वाया गेलीये. मला अजून पर्यंत दुर्गामूर्तीसाठी ऑर्डर मिळालेली नाही.” मृत्युंजय मित्रा सांगतात.
१८ व्या शतकापासून कुमारतुलीमध्ये कुंभार हाताने दुर्गा देवीच्या मूर्ती बनवतायत. कोलकात्यातील त्यावेळच्या श्रीमंत जमीनदार आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या घरच्या वार्षिक दुर्गा पूजेच्या उत्सवासाठी मूर्ती खरेदी करायला सुरुवात केली. बहुतेक कारागीर हे मूळचे नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगरचे आहेत. जशी हस्तकलेला शहरातून मागणी वाढली तसे हे स्थलांतरित कारागीर उत्तर कोलकत्यात हुबळी नदीच्या काठावर कुमारतुली मध्येच स्थायिक झाले.
मी १८ जूनला कुंभारवाड्यात पोहचलो तेव्हा कोलकाता महानगरपालिका २० मे च्या अम्फान चक्रीवादळाने पडलेली झाडं उचलत होती. ते सोडता एरवी कायम गजबजलेल्या या वस्तीमध्ये शांतता होती. बहुतेक स्टुडिओ तर बंदच होते. काहींनी स्टुडिओ उघडले होते पण मूर्तींची कामं कुठेच सुरू दिसत नव्हती. देवतांच्या तुटलेल्या आणि अपूर्ण मूर्ती रस्त्यावरच पडून होत्या. सजावटीची दुकाने उघडलेली असली तरी ग्राहक मात्र कुठेच दिसत नव्हते. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावेळी जून महिन्यातील चित्र काहीसं निराळंच होतं.
कुमारतुली मध्ये भेटलेल्या कारागिरांनी मला सांगितलं की २०१९ मध्ये त्यांच्या सगळ्यांचा मिळून ४० कोटी रुपयांचा धंदा झाला होता. त्याचा मोठा हिस्सा हा दुर्गा मूर्तींच्या विक्रीतून आला होता. याच सोबत ते इतर देवतांच्या मूर्ती सुद्धा बनवतात आणि कधी कधी चित्रपटांसाठी मातीचे पुतळे बनवण्याची त्यांना मागणी येते. त्यांच्या पैकी काहीजण मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवतात. त्यांना यावर्षी मूर्तींच्या विक्रीत वाढ होण्याची आशा होती पण त्या आधीच कोविड १९ मुळे सगळ्या गोष्टी ठप्प होऊन बसल्या.














