“मैं तेज दौड कर आऊँगा और कुनो में बस जाऊँगा.”
एका पोस्टरवरचा हा चिंटू चित्ता ऐकायला वेळ असणाऱ्या किंवा वाचता येणाऱ्यांना सांगतोय.
अंदाजे सहा महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश वनविभागाने वरिष्ठांच्या आदेशानंतर हे पोस्टर इथे लावलं. कुनो अभयारण्याभोवतीच्या सगळ्याच गावांमध्ये आता ही पोस्टर पोचली आहेत. पोस्टरवरच्या चिंटू चित्त्याला आता इथे घरोबा करायचाय म्हणे.
चिंटूच्या घरात त्याच्या सोबत खरेखुरे ५० आफ्रिकन चित्ते असणार आहेत. पण त्यांच्या येण्यामुळे बागचा गावातल्या ५५६ माणसांची मात्र गच्छंती होणार आहे. त्यांना आता तिथून हटवून दुसरीकडे पुनर्वसित केलं जाणार आहे. इथल्या सहरिया आदिवासींची या जागेशी, जंगलांशी नाळ जोडली गेली आहे. त्यांचं रोजचं जगणं आणि जीवनाधारच आता तुटणार आहेत.
चित्ता आल्यावर त्याला पहायला कोम येणार? ज्यांचे खिसे गरम आहेत असे पर्यटकच अभयारण्यातल्या महागड्या सफरींवर जाऊ शकतील. आणि त्यात अर्थातच इथले स्थानिक रहिवासी नाहीत कारण बहुतेकांची मजल गरिबी रेषेच्या वर गेलेली नाही.
दरम्यान पोस्टरवरच्या या गोंडस प्राण्याच्या चित्राने काहींना गोंधळात टाकलंय. अभयारण्यापासून २० किलोमीटर दूर असलेल्या पैरा जटाव पाड्यावरचा आठ वर्षांचा सत्यन जटाव त्याच्या वडलांना विचारतो, “हा बोकड आहे का?” त्याचा धाकटा भाऊ, चार वर्षांचा अनुरोध मात्र हा कुत्रा असणार असंच धरून चाललाय.














