“आम्ही आमच्या मातीत कोणतीही रसायनं मिसळत नाही. कीड मारण्यासाठी मातीला विषाची गरज नसते. जर मातीचं आरोग्य चांगलं असेल तर तिचं तीच सगळं आटोक्यात आणते,” महेंद्र नौरी सांगतो. त्यांचं शेत नियामगिरी डोंगररांगांपासून १.५ किलोमीटरवर आहे. “फक्त एकच करायचं, बांधावर मोहाचं किंवा शेवग्याचं झाड पाहिजे जे पक्षी, पाली आणि बेडकांना आश्रय देतं. पिकासाठी हानीकारक असणाऱ्या किड्यांचा, अळ्यांचा ही मंडळी बंदोबस्त करतात.”
महेंद्रची दोन एकर जमीन केरंदीगुडा गावी आहे. ओदिशाच्या नैऋत्येला रायगडा जिल्ह्यातल्या बिस्समकटक तालुक्यातलं हे १०० लोकांची वस्ती असलेलं गाव. इथली बहुतेक कुटुंब कोंध आदिवासी आहेत, नौरी मात्र दोरा समुदायाचे आहेत.
३० वर्षांचा महेंद्र आणि त्याचे ६२ वर्षीय वडील लोकनाथ त्यांच्या रानात ३४ प्रकारची पिकं घेतात – त्यातही विविध वाणं मोजली तर ७२. रानाच्या वेगवेगळ्या भागात एका पाठोपाठ एक ही पिकं घेतली जातात. त्यात आहेत छोटी तृणधान्यं (सुआन आणि सिक्रा), डाळी (तूर, मूग आणि इतर), तेलबिया (जवस, सूर्यफूल आणि भुईमूग), कंद, हळद, आलं, पालेभाज्या, टोमॅटो, वांगी आणि इतरही किती तरी. “आम्हाला अन्नधान्यासाठी बाजाराची गरज नाही,” महेंद्र सांगतो.
नियामगिरीच्या डोंगरांमधून वाहणाऱ्या झऱ्यांचं पाणी इथे लोक वापरतात. दगडाचे बांध घालून पाणी शेताकडे वळवलं जातं. “गेल्या चार वर्षात इथलं हवामान साथ देत नाहीये,” लोकनाथ सांगतात, “पण या सगळ्या कठिण काळात आमच्या पिकांनी आम्हाला तारलं आहे. मी कधीही कोणाकडून कर्ज घेतलेलं नाही. आणि हे केवळ आमच्या पूर्वापार चालत आलेल्या शेती पद्धतीमुळे शक्य आहे.” या कुटुंबाचं भरणपोषण रानातल्या पिकांवरच होतं आणि काही वरकड पीक असेल तर ते मुनीगुडा आणि बिस्समकटक इथल्या आठवडी बाजारांमध्ये विकतात.
“मी गेली ५० वर्षं शेती करतोय. पेरणीसाठी मातीची मशागत कशी करायची ते मी माझ्या वडलांकडून शिकलो,” लोकनाथ सांगतात. त्यांचे वडील भूमीहीन शेतकरी होते, आणि लोकनाथही अनेक वर्षं शेतमजुरी करत होते. वयाच्या तिशीमध्ये त्यांना सरकारकडून जमीन मिळाली आणि त्यांनी बी जतन करायला सुरुवात केली.
“आजही मी [माझे वडील वापरायचे] त्याच पद्धती वापरतोय आणि मला तसंच फळ मिळतंय,” ते पुढे सांगतात. “पण मी आजच्या पिढीचे शेतकरी पाहतोय ना, कपाशीचं पीक घेतायत आणि मातीची वाट लावतायत. या मातीत तुम्हाला गांडुळं दिसणार नाहीत. कारण त्यांनी माती निबर करून टाकलीये. शेतकऱ्यांनी त्यांचं भाताचं आणि भाज्यांचं बी बदललंय, खतं आणि कीटकनाशकं वापरायला सुरुवात केलीये. त्यांच्या मालाला काही तरी चव उरलीये का? आणि त्यांना पैसेही तेवढे मिळत नाहीयेत कारण ते खतं आणि औषधावर जास्तीत जास्त खर्च करायला लागलेत.”
लोकनाथ यांच्यासह केरंदीगुडातली फक्त चार कुटुंबं कोणतीही रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरत नाहीत, नौरी सांगतात. आता तर या भागातल्या अगदी दुर्गम आदिवासी पाड्यांवर देखील यांचा वापर सुरू झाला आहे, महेंद्र सांगतो. तसंच काही आदिवासी कुटुंबांनी त्यांच्या जमिनी व्यापाऱ्यांना कापूस आणि नीलगिरीच्या लागवडीसाठी भाड्याने दिल्या आहेत, या दोन्हीत प्रचंड प्रमाणात रसायनं आणि तणनाशकं वापरली जातात.
लोकनाथ आणि महेंद्र भाताचे चार पारंपरिक वाणही लावतात – बहुरुपी, भांजीबुता, बोधना आणि लालबोरो. लोकनाथ सांगतात की या भागात ३० वर्षांपूर्वी बोधनाचं पीक घेतलं जायचं मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी आता त्याऐवजी इतर वाण लावायला सुरुवात केली आहे. त्यांनी मात्र ते बी जतन करून ठेवलं आहे. हे कमी दिवसात आणि खाचराशिवाय येणारं वाण आहे आणि वर्षातून तीनदा पीक घेता येतं. इतर तीन वाण महेंद्रने डॉ. देबल देब यांच्याकडून आणले आहेत. डॉ. देब २०११ पासून केरंदीगुडामध्ये त्यांच्या २.५ एकर रानात वास्तव्याला आहेत. इथल्या स्थानिक आदिवासींसोबत ते बियांसंबंधीचं पारंपरिक ज्ञान पुनरुज्जीवित करण्याचं आणि संवर्धनाचं काम करत आहेत. स्वतःच्या शेतीसोबतच महेंद्र डॉ. देब यांच्यासोबत बी संवर्धनाचं काम करतो आणि महिन्याला त्याला रु. ३००० मानधन म्हणून मिळतात.
तो सांगतो, त्याचे वडील लोकनाथ त्याचे शिक्षक-मार्गदर्शक आहेत, ज्यांनी गेली अनेक दशकं बिया आणि पिकं किडीपासून सुरक्षित ठेवण्याच्या विविध पारंपरिक पद्धती वापरल्या आहेत. उदा. अधून मधून आंतरपीक म्हणून भाज्या (जसं की कांदा) लावल्याने त्यांच्या वासाने काही किडी जातात आणि मातीत नत्राचं प्रमाण वाढतं किंवा तृणधान्याच्या लागवडीत मिश्र पीक पद्धती (हंगामानुसार बदलती) वापरणं. महेंद्र, त्याचा भाऊ आणि पाच बहिणी, सगळे त्यांच्या कुटुंबाच्या रानात काम करतात. “मी माझ्या वडलांकडून शेती शिकलो आणि मग त्यातल्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट झाल्या त्या डॉ. देब आणि लिव्हिंग फार्म्ससोबत [रायगडा आणि कलाहांडी जिल्ह्यातील आदिवासींसोबत काम करणारी सामाजिक संस्था] काम करून,” परागीभवनातल्या किंवा साळीच्या वाढीबाबत तांत्रिक बाबी आणि दस्तावेजीकरणाबद्दल तो सांगतो.
महेंद्रने राष्ट्रीय मुक्त विज्ञालय संस्थेतून शिक्षण घेतलं आणि बिस्समकटकच्या मा मरकामा महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो जैव तंत्रज्ञान विषयातल्या पुढच्या पदवीसाठी कटकच्या रेवनशॉ महाविद्यालयात गेला. मात्र घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्याला पुढचं शिक्षण सोडावं लागलं आणि तो केरंदीगुडाला आपल्या वडलांसोबत काम करण्यासाठी परतला.
महेंद्रला त्याच्या भागातली माती आणि झाडांची जैवविविधता जतन करायची आहे. त्याने महसूल खात्याचा एक पडक जमिनीचा तुकडा आता एका घनदाट नैसर्गिक वनात रुपांतरित केला आहे. २००१ साली त्याने या भूखंडावरची झाडं जतन करायला सुरुवात केली. “आहेत ती झाडं जपणं महत्त्वाचं होतं, नवी झाडं लावण्याची गरजच नव्हती,” तो सांगतो. “कोणतीही बांधबंदिस्ती नसलेला हा माळाचा भाग होता. अशी जमीन एक दोन वर्षांसाठी पडक ठेवली जाते जेणेकरून ती तृणधान्यांसाठी तयार होते. मी झाडं वाढवण्यासाठी ही जमीन जपायचं ठरवलं. आता आम्ही [या जागेतून] जंगली कंद, अळंबी, सियालीची पानं, मोहाची फुलं, चारोळ्या आणि किती तरी गोष्टी गोळा करतो. आम्हाला आता या वनाचा लाभ मिळायला लागला आहे...”
अनुवादः मेधा काळे